Saturday, August 2, 2025
HomeBlogजळगावचे माजी नगरसेवक बंटी जोशी यांची आत्महत्या; शहरात खळबळ

जळगावचे माजी नगरसेवक बंटी जोशी यांची आत्महत्या; शहरात खळबळ

जळगावचे माजी नगरसेवक बंटी जोशी यांची आत्महत्या; शहरात खळबळ

जळगाव, – शहरातील माजी नगरसेवक आणि सामाजिक कार्यात सक्रिय असलेले अनंत हरिश्चंद्र जोशी उर्फ बंटी जोशी (वय ४८) यांनी आज दुपारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून, त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलीस तपास सुरु असून, मृत्यूमागील नेमकी कारणमीमांसा केली जात आहे.


जळगाव मनपाचे माजी नगरसेवक अनंत जोशी हे जयनगर परिसरातील आपल्या निवासस्थानी राहात होते. दुपारी १ ते ३ दरम्यान वरच्या मजल्यावर त्यांनी गळफास घेतल्याचा अंदाज आहे. सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही बाब उघडकीस आली. नातेवाईकांनी तत्काळ त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

समर्थकांचा रुग्णालयात मोठा जमाव
बंटी जोशी यांच्या आत्महत्येची बातमी पसरताच त्यांच्या समर्थकांनी जिल्हा रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. भावनिक वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी रुग्णालयात बंदोबस्त तैनात केला.

सामाजिक क्षेत्रातील सक्रिय सहभाग
बंटी जोशी हे जळगाव शहरातील ओळखले जाणारे व्यक्तिमत्व होते. नगरसेवक असताना तसेच त्यानंतरही त्यांनी नागरिकांच्या समस्या मांडण्याचा आणि सोडवण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्या अकस्मात जाण्याने सामाजिक आणि राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे.

पोलीस तपास सुरु
याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पथक तपास करत असून, आत्महत्येचे नेमके कारण शोधण्यासाठी कुटुंबीय आणि परिचितांकडे चौकशी सुरु आहे.

बंटी जोशी यांच्या निधनामुळे जळगाव शहरात शोककळा पसरली असून, त्यांच्या समाजसेवेला अनेकांकडून श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.

ताज्या बातम्या