जळगाव बसस्थानकात प्रवाशांचे खिसे कापणारी टोळी जेरबंद ; साडेपाच लाखांचा मुद्देमाल हस्तगत
प्रतिनिधी | जळगाव
शहरातील नवीन बसस्थानक परिसरात गर्दीचा फायदा घेत प्रवाशांचे खिसे कापून चोरी करणाऱ्या टोळीतील तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी (२५ जून) दुपारी अटक केली आहे. ही टोळी अमरावती जिल्ह्यातील असून, त्यांच्या ताब्यातून साडेपाच लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून बसस्थानक परिसरात खिसेकापीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी व अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी एलसीबीच्या पथकाला कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उ.नि. शरद बागल, पो.कॉ. अक्रम शेख, नितीन बाविस्कर, प्रवीण भालेराव, किशोर पाटील व रविंद्र कापडणे यांच्या पथकाने कारवाई केली.
पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, बुधवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास संशयित हालचाली करणाऱ्या तिघांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी बसस्थानकात खिसे कापल्याची कबुली दिली. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अशी आहेत – अहमद बेग कादर बेग (६२), हफिज शाह हबीब शाह (४९) आणि अजहर हुसैन हफर हुसेन (४९), तिघेही अमरावती येथील रहिवासी.
पोलिसांनी आरोपींच्या अंगझडती व वाहनाची झडती घेतली असता, ३३ हजार ८३० रुपये रोकड, १७ हजार ५०० रुपये किमतीचे पाच मोबाईल, एक रेक्झीन बॅग आणि ५ लाख रुपये किमतीची इंडीका कार असा सुमारे ५ लाख ५३ हजार ८३० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. या प्रकरणाचा तपास जिल्हापेठ पोलीस करत आहेत.