जळगाव: महाराष्ट्र शासनाने ‘विकसित महाराष्ट्र@२०४७’ व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्यासाठी उच्च शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांचा एक राज्यस्तरीय कार्य बल गट (टास्क फोर्स) स्थापन केला आहे. यात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या १५० दिवसांच्या कार्यक्रमानुसार ‘विकसित महाराष्ट्र@२०४७’ व्हिजन डॉक्युमेंट तयार केले जाणार आहे. या कार्य बल गटाचे अध्यक्ष मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी असून, यात एकूण १३ सदस्यांचा समावेश आहे.
हा गट सन २०२९, २०३५ आणि २०४७ मध्ये येणाऱ्या आव्हाने आणि संधींचा विचार करेल. बदलत्या तंत्रज्ञानानुसार राज्याच्या प्रादेशिक विकासाला चालना देण्यासाठी ‘प्रगतिशील, शाश्वत, सर्वसमावेशक आणि सुशासन’ या चार प्रमुख स्तंभांवर आधारित व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याचे काम हा गट करणार आहे.
या समितीत इतरही अनेक शिक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश आहे, जसे की, शिवाजी विद्यापीठ (कोल्हापूर), हैद्राबाद सिंध नॅशनल कॉलेजिएट विद्यापीठ (मुंबई), भारतीय माहिती व तंत्रज्ञान संस्था (प्रयागराज) तसेच सी-डॅक, आय.आय.टी., बार्टी, आणि परसिस्टंट सिस्टिममधील तज्ज्ञ सदस्य म्हणून काम करतील.