जळगावात ढोल ताशाच्या गजरात जल्लोषपूर्ण वातावरणात लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप
जळगाव : सहा सप्टेंबर रोजी शहरात आनंत चतुर्दशी निमित्त गणपती बाप्पाच्या मिरवणुकांना उत्साह, ढोल-ताशांचा गजर आणि भक्तीभावाने भरलेले वातावरण लाभले. सकाळपासूनच विविध मंडळांनी आपल्या बाप्पाला निरोप देण्यासाठी तयारी केली होती. दुपारनंतर मुख्य मिरवणुकीला सुरुवात झाली असून शहरातील प्रमुख रस्ते, चौक आणि गल्ली-बोळ सजून निघाले.
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा गजरात मंडळांचे व घरगुती गणपती नदीकाठी विसर्जनासाठी नेण्यात आले. काही ठिकाणी पारंपरिक ढोल-ताशा पथकांनी सादरीकरण करून वातावरण भारावून टाकले, तर काही ठिकाणी लेझीम, आणि आकर्षक ढोल आणि झांज पथकाने मिरवणुकीला रंगत आणली. महिलांचाही उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला.
याप्रसंगी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी विसर्जन मिरवणुकीसाठी कडक बंदोबस्त ठेवला होता. स्वयंसेवी संघटनांनी पाणी, प्रसाद व वैद्यकीय मदतीची सोय केली. पर्यावरणपूरक मूर्ती विसर्जनासाठीही स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती.
शेवटच्या आरतीनंतर हजारो भाविकांच्या जयघोषात गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. संपूर्ण शहरात श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाचे अनोखे वातावरण अनुभवायला मिळाले.