गणेशोत्सवासाठी ‘विकास’ची गोड भेट – मावा आणि बेरीफी मोदक बाजारात
नवीन गवा चिली लस्सीचेही लोकार्पण
जळगाव – गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघ मर्यादितच्या ‘विकास’ ब्रँडने ग्राहकांसाठी गोडीची नवी भेट दिली आहे. सोमवारी (दि. २५ ऑगस्ट) संघाच्या मुख्य कार्यालयात झालेल्या समारंभात ‘विकास मावा मोदक’ व ‘विकास बेरीफी मोदक’ या दोन नव्या उत्पादनांचे लोकार्पण करण्यात आले. यासोबतच ‘विकास गवा चिली लस्सी’ हे नाविन्यपूर्ण पेयही ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे.
या लोकार्पण कार्यक्रमाला संस्थेचे संचालक, पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कार्यकारी संचालक शैलेश मोरखडे म्हणाले की, “गणेशोत्सव हा आपल्या संस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे. पारंपरिकतेला स्पर्श करणारी शुद्ध आणि दर्जेदार उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहोचवणे हीच आमची प्राथमिकता आहे. ग्राहकांचा विश्वास हेच आमचे खरे बळ असून, गुणवत्ता आणि चवीतून तो कायम राखण्याचा आमचा प्रयत्न आहे.”
कार्यक्रमास संचालक मंडळातील चिमणराव पाटील, संजय पंवार, मधुकर राणे, प्रमोद पाटील, अरविंद देशमुख, नितीन चौधरी, ठकसेन पाटील, पराग मोरे, रावसाहेब भोसले, दगडू चौधरी, शामलताई झांबरे व रमेश पाटील उपस्थित होते.
‘विकास मावा मोदक’ व ‘विकास बेरीफी मोदक’ यांच्यासह ‘गवा चिली लस्सी’ आता जळगावासह परिसरातील अधिकृत विक्रेत्यांकडे उपलब्ध झाली आहेत. या उत्पादनांना गणेशोत्सवात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल आणि ती घरोघरी प्रसाद म्हणून पोहोचतील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला. ‘विकास’ ब्रँडने नव्या उत्पादनांद्वारे गणेशोत्सवाच्या भक्तिमय वातावरणात गोडवा आणला आहे.