कर्तव्य बजावून घरी परतणाऱ्या वाहकाचा अपघातात मृत्यू
जामनेर येथील एस. टी. महामंडळात वाहकाचे कर्तव्य पार पाडून आपल्या दुचाकीने घरी परत जाताना समोरून येणाऱ्या बसवर आदळून झालेल्या अपघातात ईश्वर अरुण खंडागळे (वय ४०) यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील शहापूर गावाजवळील धरणाजवळ २५ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली.
तालुक्यातील चिंचखेडा तवा येथील मयत ईश्वर खंडागळे हे जामनेर बस आगारामध्ये वाहक पदावर कार्यरत होते. ते २५ रोजी जामनेर ते सुरत या बसवर वाहकाचे कर्तव्य पार पाडून जामनेर तालुक्यातील चिंचखेडा तवा या आपल्या गावी दुचाकीवरून घरी परत जात होते. त्याच वेळी जामनेर आगाराची बुलढाणा ते जामनेर ही बस
तालुक्यातील शहापूर गावाजवळील धरणाजवळ समोरून येत होती. ही बस व त्यांची दुचाकी यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ईश्वर खंडागळे हे खाली पडले. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची ही दुर्दैवी घटना २५ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. शवविच्छेदनासाठी त्यांच्या मृतदेह जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. मयत ईश्वर खंडागळे हे आज रात्री आपल्या गावातील मित्रांसोबत शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी जाणार होते, असे त्यांच्या नातेवाईकांकडून सांगण्यात आले. या दुर्दैवी घटनेमुळे जामनेर आगार, चिंचखेडा तवा यासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.