सीमावर्ती चार राज्यांमध्ये उद्या मॉक ड्रिल; नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
नवी दिल्ली, (प्रतिनिधी) –पाकिस्तानच्या सीमेलगत असलेल्या गुजरात, राजस्थान, पंजाब आणि जम्मू-काश्मीर या चार राज्यांमध्ये उद्या, २९ मे रोजी संध्याकाळी व्यापक मॉक ड्रिल (सराव मोहिम) राबवण्यात येणार आहे. संभाव्य आपत्कालीन परिस्थितींचा सामना करण्यासाठी प्रशासन आणि नागरिक यांची तयारी तपासण्यासाठी हा सराव होत असून, नागरिकांनी सतर्क राहून घाबरून न जाण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
यापूर्वी ७ मे रोजी देशातील २४४ जिल्ह्यांमध्ये मॉक ड्रिल घेण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, ६-७ मे च्या रात्री भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर अचूक लष्करी कारवाई केली होती. या कारवाईत भारताने नऊ दहशतवादी छावण्यांवर हल्ला करून अनेक दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानने युद्धबंदी जाहीर केली होती.
तरीही, देशाच्या सीमेलगतच्या संवेदनशील भागात सज्जता वाढवण्यासाठी पुन्हा एकदा मॉक ड्रिल आयोजित करण्यात आली आहे. या सरावामध्ये स्थानिक प्रशासन, पोलिस दल, अग्निशमन विभाग, वैद्यकीय आपत्कालीन सेवा यांचा सहभाग असणार आहे. मॉक ड्रिलदरम्यान नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत वागण्याचे प्रशिक्षण आणि सूचना दिल्या जातील.
भारत सरकारने स्पष्ट केले आहे की, ‘ऑपरेशन सिंदूर’ ही कारवाई पाकिस्तानातील नागरिकांविरोधात नव्हे, तर दहशतवादाविरोधात होती. यामध्ये नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले असून, आणखी १२ तळ भारताच्या रडारवर आहेत. पाकिस्तानला यासंबंधीची माहिती देण्यात आली असून, भविष्यातील कारवाया रोखण्याचा इशारा देण्यात आला आहे.
ही मॉक ड्रिल भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा एक महत्त्वाचा टप्पा मानली जात आहे. दहशतवादाविरुद्ध भारताने उचललेल्या कठोर पावलांमुळे सीमावर्ती भागातील सज्जतेस महत्त्व प्राप्त झाले आहे. नागरिकांनी शांतता राखून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन पुन्हा एकदा करण्यात आले आहे