शिक्षण विभागात मोठे फेरबदल; १३ उपशिक्षणाधिकाऱ्यांना ‘शिक्षणाधिकारी’ पदोन्नती
निलेश पाटील जळगावचे नवे प्राथमिक शिक्षणाधिकारी; राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय
मुंबई / जळगाव प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने सोमवारी निर्गमित केलेल्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयामुळे राज्यातील शिक्षण प्रशासनात मोठे फेरबदल घडून आले आहेत. रिक्त पदे भरण्याच्या दृष्टीने उचललेल्या या पावलांतर्गत राज्यातील १३ उपशिक्षणाधिकाऱ्यांना ‘शिक्षणाधिकारी व तत्सम’ (गट-अ) पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. या निर्णयानुसार जळगाव जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी पदी निलेश दे. पाटील यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यामुळे जिल्ह्याच्या शिक्षण प्रशासनाला दीर्घकाळानंतर पूर्णवेळ अधिकारी मिळाला आहे.
जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षणाधिकारी पद गेल्या काही काळापासून रिक्त होते. या पदाचा प्रभारी पदभार माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांच्याकडे होता. मात्र आता निलेश पाटील यांच्या नियुक्तीमुळे प्राथमिक शिक्षण विभागातील प्रशासकीय कामकाजाला गती मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
वेतनश्रेणी व पदोन्नतीचे स्वरूप
पदोन्नती मिळालेले सर्व अधिकारी यापूर्वी गट-ब (प्रशासन शाखा) मधील उपशिक्षणाधिकारी पदावर कार्यरत होते. त्यांना आता पे बँड एस-२० (५६,१०० ते १,७७,५०० रुपये) या सुधारित वेतनश्रेणीत तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नती देण्यात आली आहे. या नियुक्त्या सर्वोच्च व उच्च न्यायालयात प्रलंबित विविध याचिकांच्या अंतिम निकालाच्या अधीन राहणार असल्याचेही शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे.
पदोन्नतीप्राप्त अधिकारी व नवीन पदस्थापना
पदोन्नती मिळालेल्या अधिकाऱ्यांमध्ये शशिकांत गुंडू चिमणे (पुणे विभाग) यांची सहायक आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे येथे नियुक्ती झाली आहे. श्रीमती साईलता कृष्णा सामलेटी (नाशिक विभाग) यांची नाशिक जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक) पदी पदस्थापना करण्यात आली आहे. रविंद्र सिद्धेश्वर खंदारे (छत्रपती संभाजीनगर विभाग) यांची धाराशिव जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक) पदी रवानगी झाली आहे.
विपुल रमेशराव भागवत (छ. संभाजीनगर विभाग) हे हिंगोली जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) म्हणून कार्यभार स्वीकारतील. मंदाकिनी उत्तम देवकर (नाशिक विभाग) यांची सहायक संचालक, विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय, नाशिक येथे नियुक्ती करण्यात आली आहे. भास्कर ढवळू कनोज (पुणे विभाग) यांची प्राचार्य, शासकीय विद्यानिकेतन, पुसेगाव (जि. सातारा) पदी नियुक्ती झाली आहे.
गणेश रामचंद्र फुलसुंदर (कोकण विभाग) यांची शिक्षणाधिकारी (योजना), बृहन्मुंबई या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. सिमा विठ्ठल पाटील (नागपूर विभाग) या वर्धा जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक) म्हणून कार्यरत राहतील. अमोल श्रीधरराव पवार (अमरावती विभाग) यांची सहायक संचालक, विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय, अमरावती येथे नियुक्ती झाली आहे.
दत्ता प्रभाकर कठाळे (पुणे विभाग) यांची सहसचिव, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे येथे नियुक्ती करण्यात आली आहे. निलिमा भिकाजी नाईक (कोकण विभाग) यांची रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक) पदी पदस्थापना झाली आहे. अनिल श्रीधरराव दहिफळे (नागपूर विभाग) हे नागपूर जिल्हा परिषदेचे नवे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) असतील. तर दिव्यांग प्रवर्गातून पदोन्नती मिळवत निलेश दे. पाटील (नाशिक विभाग) यांची जळगाव जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक) पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
३० दिवसांत रुजू होण्याचे आदेश
शासनाने संबंधित अधिकाऱ्यांना पदोन्नती आदेश प्राप्त झाल्यापासून ३० दिवसांच्या आत नव्या पदावर रुजू होणे बंधनकारक केले आहे. तसेच आयुक्त (शिक्षण) यांनी या अधिकाऱ्यांना तातडीने कार्यमुक्त करून तसा अहवाल शासनास सादर करावा, असे निर्देश उपसचिव मो. बा. ताशिलदार यांनी दिले आहेत. या निर्णयामुळे राज्यातील अनेक दिवसांपासून रिक्त असलेली शिक्षणाधिकारी पदे भरली गेली असून, शालेय शिक्षणाच्या प्रशासनाला आता नवसंजीवनी मिळणार असल्याचे चित्र आहे.
