Sunday, September 20, 2026
Homeखानदेशहोर्मुझ ओलांडत भारतीय गॅस जहाजांची वाटचाल; ९२,७०० टन एलपीजीसह दोन जहाजे भारतात...

होर्मुझ ओलांडत भारतीय गॅस जहाजांची वाटचाल; ९२,७०० टन एलपीजीसह दोन जहाजे भारतात येणार

होर्मुझ ओलांडत भारतीय गॅस जहाजांची वाटचाल; ९२,७०० टन एलपीजीसह दोन जहाजे भारतात येणार

पश्चिमेकडे अडकलेली आणखी २२ जहाजे; मध्यपूर्वेतील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ऊर्जा पुरवठ्यावर भारताची नजर

मुंबई | प्रतिनिधी : मध्यपूर्वेतील तणावपूर्ण परिस्थिती असूनही कतारसह आखाती देशांतून स्वयंपाकाच्या गॅसचा मोठा साठा घेऊन येणारी भारतीय जहाजे होर्मुझ सामुद्रधुनी सुरक्षितपणे पार करू लागली आहेत. ‘शिवालिक’ आणि ‘नंदा देवी’ ही दोन एलपीजी वाहक जहाजे सामुद्रधुनी ओलांडून भारताच्या दिशेने मार्गस्थ झाली असून, येत्या १७ मार्चपर्यंत ती सुमारे ९२,७०० टन एलपीजीसह भारतीय बंदरांवर दाखल होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.


केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी व जलमार्ग मंत्रालयाचे विशेष सचिव राजेश कुमार सिन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही जहाजे शनिवारी पहाटे होर्मुझ सामुद्रधुनी पार करत भारताकडे रवाना झाली. यापैकी एक जहाज मुंद्रा बंदरावर, तर दुसरे कांडला बंदरावर १६ व १७ मार्च रोजी पोहोचण्याची शक्यता आहे.


सिन्हा यांच्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वीपर्यंत या परिसरात भारताचा ध्वज फडकावणारी २४ जहाजे होती. त्यापैकी दोन जहाजांनी मार्गक्रमण सुरू केले असले तरी आणखी २२ जहाजे अजूनही होर्मुझ सामुद्रधुनीच्या पश्चिम भागात थांबलेली आहेत. या जहाजांमध्ये सहा एलपीजी वाहक, चार कच्चे तेल वाहक आणि एक एलएनजी वाहक जहाज असून त्यावर एकूण ६११ भारतीय खलाशी कार्यरत आहेत.

‘ब्लूमबर्ग’च्या माहितीनुसार, ‘शिवालिक’ आणि ‘नंदा देवी’ या दोन्ही जहाजांना इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने भाडेतत्त्वावर घेतले असून त्यांची मालकी शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडे आहे. दोन्ही जहाजांनी कतारमधील रास लाफान बंदरातून एलपीजी भरून भारताच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे.

मध्यपूर्वेतील संघर्षामुळे होर्मुझ सामुद्रधुनीच्या पश्चिम भागात अडकलेल्या भारतीय जहाजांबाबत चिंता व्यक्त होत असताना भारतामधील इराणचे राजदूत मोहम्मद फताली यांनी अलीकडेच भारताला मित्रदेश असल्याचे सांगत अनेक भारतीय जहाजांना या जलमार्गातून मार्गक्रमणाची परवानगी देण्यात आल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे भारतातील संभाव्य गॅस टंचाईची भीती काहीशी कमी होण्याचे संकेत मिळत आहेत.

या जहाजांबद्दल थोडक्यात
ही जहाजे LPG tanker / Gas carrier म्हणून ओळखली जातात.
त्यामध्ये द्रव स्वरूपातील पेट्रोलियम गॅस (LPG) मोठ्या टाक्यांमध्ये साठवून वाहतूक केली जाते.
अशा जहाजांची क्षमता साधारण ३०,००० ते ९०,००० टन किंवा त्याहून अधिक असू शकते.

भारतात घरगुती सिलिंडरसाठी लागणारा मोठा गॅस पुरवठा कतार, सौदी अरेबिया आणि इतर आखाती देशांतून अशाच जहाजांनी येतो.
“शिवालिक” आणि “नंदा देवी” या भारतीय जहाजांनी होर्मुझ सामुद्रधुनी पार करून सुमारे ९२,७०० टन LPG भारताकडे आणत आहेत, जे देशाच्या गॅस पुरवठ्यासाठी महत्त्वाचे मानले जाते.

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या