Thursday, March 12, 2026
Homeजळगाव जिल्हाविधानभवन बॉम्बने उडवण्याची ई-मेलद्वारे धमकी; सुरक्षा यंत्रणा सतर्क

विधानभवन बॉम्बने उडवण्याची ई-मेलद्वारे धमकी; सुरक्षा यंत्रणा सतर्क

विधानभवन बॉम्बने उडवण्याची ई-मेलद्वारे धमकी; सुरक्षा यंत्रणा सतर्क

अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान खळबळ; बॉम्ब शोधक पथकाकडून तपासणी

मुंबई | प्रतिनिधी : राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना मुंबईतील विधानभवन बॉम्बने उडवून देण्याची धमकी ई-मेलद्वारे मिळाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे प्रशासन व सुरक्षा यंत्रणांमध्ये एकच खळबळ उडाली. धमकीची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ विधानभवन परिसराचा ताबा घेत सखोल तपासणी सुरू केली.

बॉम्ब शोधक व श्वान पथकाकडून तपासणी
धमकीनंतर बॉम्ब शोधक व नाशक पथक (BDDS) तसेच श्वान पथकाने विधानभवन इमारतीची सखोल पाहणी केली. सुरक्षा तपासणीदरम्यान इमारतीतील सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांना काही काळासाठी बाहेर काढण्यात आल्याची माहिती मिळाली.

आणखी चार ठिकाणांना धमकी
विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “आज सकाळी सुमारे ६.५७ वाजता मुंबई पोलीस आयुक्तांच्या ई-मेलवर धमकीचा संदेश प्राप्त झाला. त्यात विधानभवन बॉम्ब किंवा क्षेपणास्त्राने उडवून देण्याचा उल्लेख होता.”

तसेच विधानभवनासह आणखी चार महत्त्वाच्या ठिकाणांसाठीही धमकी मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
धमकी खोटी असल्याची प्राथमिक माहिती
दरम्यान, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी माध्यमांशी बोलताना ही धमकी खोटी असल्याची प्राथमिक माहिती मिळाल्याचे सांगितले. तरीही सुरक्षा यंत्रणांकडून संपूर्ण तपास सुरू आहे.

कामकाज सुरू राहणार
बॉम्ब शोधक पथकाने तपासणी केल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात असल्याचे स्पष्ट झाले असून विधानभवनातील दोन्ही सभागृहांचे कामकाज नियोजितप्रमाणे सुरू राहणार असल्याचे राम शिंदे यांनी स्पष्ट केले. तसेच धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी तपास सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली.

ताज्या बातम्या