Saturday, June 20, 2026
Homeक्राईमजळगाव पोलिसांचा मुक्ताईनगर तालुक्यात   सर्जिकल स्ट्राइक; ‘ऑपरेशन ड्रॉप केस’मध्ये २ कोटींहून अधिक...

जळगाव पोलिसांचा मुक्ताईनगर तालुक्यात   सर्जिकल स्ट्राइक; ‘ऑपरेशन ड्रॉप केस’मध्ये २ कोटींहून अधिक मुद्देमाल जप्त

जळगाव पोलिसांचा मुक्ताईनगर तालुक्यात   सर्जिकल स्ट्राइक; ‘ऑपरेशन ड्रॉप केस’मध्ये २ कोटींहून अधिक मुद्देमाल जप्त
पाच गावांवर एकाच वेळी धाडसत्र; सराईत गुन्हेगार जेरबंद, गुन्हेगारीला मोठा हादरा
मुक्ताईनगर | प्रतिनिधी मुक्ताईनगर तालुक्यातील ‘ड्रॉप केस’ आणि सोशल मीडिया फसवणुकीसाठी कुप्रसिद्ध असलेल्या पाच गावांवर जळगाव जिल्हा पोलिसांनी गुरुवारी पहाटे धडक कारवाई करत गुन्हेगारीच्या मुळावर घाव घातला. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या ‘ऑपरेशन ड्रॉप केस’ अंतर्गत लालगोटा, हलखेडा, मधापुरी, जोंधनखेडा आणि चारठाणा या गावांमध्ये एकाच वेळी धाडसत्र राबविण्यात आले. या कारवाईत दोन कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून अनेक सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे.
दुर्मिळ वस्तूंच्या आमिषाने लुटायचे 
मधापुरी, हलखेडा आणि लालगोटा या गावांमधून सोशल मीडियाच्या माध्यमातून देशभरातील नागरिकांना जाळ्यात ओढण्याचा प्रकार सुरू होता. काळी हळद, नागमणी, रेड मर्क्युरी, सफेद बिबा, सुलेमानी दगड, जुने सोने, कॉपर, डबल इंजिन आदी कथित दुर्मिळ वस्तूंच्या नावाखाली मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून लोकांना गावात बोलावले जात होते. त्यानंतर त्यांची फसवणूक, लूटमार आणि मारहाण केली जात असल्याचे तपासात उघड झाले आहे.
गेल्या तीन वर्षांत या भागात १० दरोडे, १ खुनासह दरोडा, १ खून, ७ जबरी चोरी, १६ फसवणूक, १ दरोड्याचा प्रयत्न आणि २ सरकारी कर्मचाऱ्यांवरील हल्ल्यांचे गुन्हे दाखल असल्याने हा परिसर पोलिसांसाठी डोकेदुखी ठरला होता
शस्त्रे, रोकड, दागिने आणि वाहने जप्त
कारवाईदरम्यान पोलिसांनी २० लाखांची रोकड, सुमारे ३० लाख रुपये किमतीचे ३०० ग्रॅम सोन्याचे दागिने, ८ लाख रुपये किमतीचे ४ किलो चांदीचे दागिने, दोन गावठी कट्टे आणि तीन जिवंत काडतुसे जप्त केली. याशिवाय ३० मोबाईल, चार चारचाकी वाहने, सहा दुचाकी वाहने तसेच बनावट नोटांची बंडले हस्तगत करण्यात आली.
वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत एक हरणाचे कातडे, एक कोल्ह्याचे कातडे आणि एक सशाचे कातडेही जप्त करण्यात आले आहे.
अनेक सराईत आरोपींना अटक
या मोहिमेत फरेज राजू पवार, रामजाने राईसाहेब भोसले यांच्यासह अनेक आरोपींना अटक करण्यात आली आहे. विविध प्रकरणांमध्ये शस्त्र अधिनियम, भारतीय न्याय संहिता, महाराष्ट्र पोलीस अधिनियम आणि वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
तसेच २०२१ मधील जबरी चोरीच्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी विलास नरविलाल पवार आणि अन्य एका गंभीर गुन्ह्यातील आरोपी अजय दादा पवार यांनाही पोलिसांनी अटक केली आहे.
२०० हून अधिक पोलिसांचा सहभाग
१९ जून रोजी पहाटे राबविण्यात आलेल्या या विशेष मोहिमेत उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले, परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत दरेकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्यासह विविध पोलीस ठाण्यांचे अधिकारी आणि सुमारे २०० पोलीस अंमलदार व आरसीपी जवान सहभागी झाले होते.
गुन्हेगारीविरोधात पोलिसांचा इशारा
मुक्ताईनगर तालुक्यातील संघटित गुन्हेगारी आणि फसवणूक करणाऱ्या टोळ्यांविरोधात ही कारवाई निर्णायक मानली जात असून, अशा प्रकारच्या गुन्हेगारीला कोणतीही पाठीशी घालणार नाही, असा स्पष्ट संदेश जळगाव पोलिसांनी दिला आहे. भविष्यातही अशाच धडक मोहिमा राबवून गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन केले जाईल, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.
आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या