महाराष्ट्राला मिळाल्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री; सुनेत्रा पवार आज घेणार शपथ!
राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड; अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवारांकडे सोपवली धुरा
मुंबई (प्रतिनिधी) :राज्याच्या राजकारणातील एका ऐतिहासिक पर्वाला आजपासून सुरुवात होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी सुनेत्रा पवार यांची आज एकमताने निवड करण्यात आली असून, आज सायंकाळी ५ वाजता त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. २८ जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या दुर्दैवी विमान अपघातात अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर आता सुनेत्रा पवार यांची वर्णी लागली आहे.

दिलीप वळसे पाटलांनी मांडला प्रस्ताव
सुनेत्रा पवार यांची निवड करण्यासाठी आज शनिवारी दुपारी २ वाजता विधानभवनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्ष आणि विधानपरिषद सदस्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला, ज्याला सर्व आमदारांनी टाळ्यांच्या कडकडाटात पाठिंबा दिला.
खासदारकीचा राजीनामा आणि मुख्यमंत्र्यांची भेट
उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी सुनेत्रा पवार यांनी आपल्या राज्यसभा खासदारपदाचा राजीनामा दिला आहे. विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रमुख नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांनी ‘वर्षा’ बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. सुनेत्रा पवार यांच्या निवडीचे अधिकृत पत्र मुख्यमंत्र्यांना सोपवण्यात आले असून, मुख्यमंत्र्यांनी ही माहिती प्रोटोकॉलनुसार राज्यपालांना कळवली आहे.
सायंकाळी ५ वाजता शपथविधी
राजभवनावर आज सायंकाळी ५ वाजता हा विशेष शपथविधी सोहळा पार पडणार आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेकडे उपमुख्यमंत्रीपदाची सूत्रे सोपवली जात असल्याने याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. अजित पवारांच्या निधनानंतर पोरक्या झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला सावरण्यासाठी आणि महायुतीची ताकद टिकवून ठेवण्यासाठी सुनेत्रा पवार यांची निवड अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
