Saturday, May 9, 2026
HomeBlogदहावीच्या निकालात पुन्हा कोकणची बाजी; राज्याचा निकाल ९२.०९ टक्के

दहावीच्या निकालात पुन्हा कोकणची बाजी; राज्याचा निकाल ९२.०९ टक्के

दहावीच्या निकालात पुन्हा कोकणची बाजी; राज्याचा निकाल ९२.०९ टक्के

निकालात २.०१ टक्क्यांची घसरण; ‘लातूर पॅटर्न’चे वर्चस्व कायम

पुणे | प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला असून यंदा राज्याचा एकूण निकाल ९२.०९ टक्के लागला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत निकालात २.०१ टक्क्यांची घट नोंदवली गेली आहे. विभागनिहाय निकालात यंदाही कोकण विभागाने अव्वल स्थान पटकावले असून छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे.

राज्य मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला. राज्यातून नियमित १५ लाख ५५ हजार २६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १४ लाख २० हजार ४८६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. खासगी विद्यार्थ्यांपैकी २९ हजार ५०६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून त्यापैकी २२ हजार ३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. खासगी विद्यार्थ्यांची उत्तीर्णतेची टक्केवारी ७६.३३ इतकी नोंदवली गेली.

विभागनिहाय निकालात कोकण अव्वल
यंदा कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९७.६२ टक्के लागला. त्यापाठोपाठ कोल्हापूर विभागाचा ९५.४७ टक्के, मुंबई विभागाचा ९४.९७ टक्के आणि पुणे विभागाचा ९४.२४ टक्के निकाल लागला. नाशिक विभागाचा निकाल ९०.५३ टक्के, अमरावती विभागाचा ९०.५० टक्के, नागपूर विभागाचा ८९.०७ टक्के, लातूर विभागाचा ८८.४२ टक्के तर छत्रपती संभाजीनगर विभागाचा सर्वात कमी ८८.४१ टक्के निकाल लागला.

दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींचा निकाल मुलांपेक्षा सरस ठरला आहे. गेल्या चार वर्षांतील हा सर्वात कमी निकाल असल्याचेही स्पष्ट झाले आहे.
१७९ विद्यार्थ्यांना शतप्रतिशत गुण
दहावीच्या निकालात यंदा राज्यातील १७९ विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळवत विशेष यश संपादन केले आहे. यामध्ये सर्वाधिक १०४ विद्यार्थी लातूर विभागातील असून ‘लातूर पॅटर्न’चे वर्चस्व पुन्हा एकदा कायम राहिले आहे.

विभागनिहाय शतप्रतिशत गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये पुणे विभागातील १२, नागपूर विभागातील ३, छत्रपती संभाजीनगर विभागातील २४, मुंबई विभागातील ५, कोल्हापूर विभागातील १५, अमरावती विभागातील ३, नाशिक विभागातील ६, लातूर विभागातील १०४ आणि कोकण विभागातील ७ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

निकालाची ठळक वैशिष्ट्ये
गतवर्षीपेक्षा सहा दिवस अगोदर निकाल जाहीर
राज्यातील ६ हजार ६१२ शाळांचा १०० टक्के निकाल
८६ शाळांचा शून्य टक्के निकाल
पुरवणी परीक्षेसाठी १ लाख १७ हजार ३९५ विद्यार्थी पात्र
एकूण ६४ विषयांपैकी २० विषयांचा निकाल १०० टक्के
१० हजार ३१ दिव्यांग विद्यार्थ्यांपैकी ९ हजार ४२ विद्यार्थी उत्तीर्ण
राज्यातील पुनर्परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी ९ हजार ७५७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यांची उत्तीर्णतेची टक्केवारी ३३.७९ इतकी राहिली आहे.

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या