प्रभाग ६ मध्ये घुमला ‘तुतारी’चा आवाज; पदयात्रेने विरोधकांचे धाबे दणाणले!
जळगाव (प्रतिनिधी): जळगाव शहर महानगरपालिका निवडणुकीचा रणसंग्राम आता खऱ्या अर्थाने पेटला असून, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने प्रभाग क्रमांक ६ मध्ये आपल्या प्रचाराचा धडाका सुरू केला आहे. छत्रपती शाहू महाराज नगरातील तपस्वी हनुमान मंदिर येथे नारळ फोडून प्रचाराचा अधिकृत शुभारंभ करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी दिलेल्या घोषणांनी आणि तुतारीच्या निनादाने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.
पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस एजाज मलीक यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि ढोल-ताशांच्या गजरात या प्रचाराला सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी उमेदवारांनी छत्रपती शाहू महाराज नगर, हौसिंग सोसायटी, दत्त कॉलनी, इंदिरा नगर आणि खान्देश मील कॉलनी परिसरात झंझावाती पदयात्रा काढली. या पदयात्रेदरम्यान मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. अनेक ठिकाणी गृहिणींनी उमेदवारांचे औक्षण करून आणि पेढे भरवून त्यांचे जंगी स्वागत केले, तर कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी करत विजयाचा विश्वास व्यक्त केला.
प्रभाग ६ मधून राष्ट्रवादी काँग्रेसने (शरदचंद्र पवार) पाटील हेतल महेंद्र (६ अ), प्रेरणा रामेश्वर मिश्रा (६ ब), तनवीर अब्दुल राशिद शेख (६ क) आणि किरण लक्ष्मण राजपूत (६ ड) या चार शिलेदारांना रिंगणात उतरवले आहे. “तुतारी वाजवणारा माणूस” या चिन्हासमोरील बटण दाबून शहराच्या शाश्वत विकासाला साथ द्या, असे आवाहन या उमेदवारांनी घरोघरी जाऊन मतदारांना केले. प्रभागातील प्रलंबित प्रश्न आणि विकासाचे मुद्दे घेऊन हे उमेदवार मैदानात उतरल्याने या भागात मोठी चुरस पाहायला मिळत आहे.
प्रचाराचा हा वेग कायम राखत, सकाळी निवडणूक प्रमुख तथा माजी आमदार संतोष चौधरी यांच्या उपस्थितीत पुढील टप्प्याचा शुभारंभ होणार आहे. शहरातील ऐतिहासिक ‘चिमुकले श्रीराम मंदिर’ येथे नारळ फोडून उद्याच्या मोहिमेला सुरुवात केली जाईल, अशी माहिती पक्ष प्रतिनिधींनी दिली. जळगाव महानगरपालिकेसाठी येत्या १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून, मतदारांचा कौल कोणाकडे जातो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
