झाडग्राममध्ये ताफा थांबवून पंतप्रधान मोदींनी घेतला बंगालच्या ‘झालमुडी’चा आस्वाद !
”कांदा खातो, पण कोणाचं डोकं नाही…”; मोदींच्या मिश्किल टिप्पणीने झाडग्राममध्ये पिकला एकच हशा !
झाडग्राम I वृत्तसंस्था पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सध्या शिगेला पोहोचला आहे. राजकीय सभा आणि रॅलींच्या धावपळीत असतानाच, आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एक वेगळेच रूप पाहायला मिळाले. झाडग्राममधील सभा आटोपून परतत असताना पंतप्रधानांनी अचानक आपला ताफा थांबवला आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या एका छोट्याशा दुकानावर जाऊन बंगालची प्रसिद्ध ‘झालमुडी’ (तिखट भेळ) खाण्याचा आनंद लुटला.

https://twitter.com/i/status/2045849288811692051
जेव्हा ‘पंतप्रधान’ समोर उभे राहतात…
झाडग्राममध्ये सभेला संबोधित केल्यानंतर मोदींचा ताफा शहरातून जात होता. मात्र, अचानक त्यांनी गाडी थांबवण्यास सांगितली. पंतप्रधान चक्क रस्त्यावरील एका साध्या दुकानावर चालत गेले आणि त्यांनी दुकानदाराला प्रेमाने झालमुडी देण्याची विनंती केली. देशाचा पंतप्रधान आपल्या समोर उभा आहे, हे पाहून तो स्थानिक दुकानदारही काही काळ अवाक झाला.
https://x.com/i/status/2045849288811692051
मिश्किल संवाद आणि हशा
पंतप्रधान आणि दुकानदार यांच्यात झालेला संवाद सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मोदी : चांगली झालमुडी किती रुपयांना असते? दुकानदार : १० किंवा २० रुपयांना. मोदी : जे असेल ते बनवा.
यावेळी दुकानदाराने जेव्हा विचारले की, “कांदा खाणार का?”, त्यावर मोदींनी हसत उत्तर दिले, “हो, मी कांदा खातो, मात्र कोणाचं डोकं नाही!” मोदींच्या या मिश्किल उत्तराने तिथे उपस्थित असलेल्या सुरक्षा रक्षकांमध्ये आणि नागरिकांमध्ये एकच हशा पिकला.

”नाही दादा, पैसे तर घ्यावेच लागतील!”
झालमुडीचा आस्वाद घेतल्यानंतर मोदींनी आपल्या खिशातून १० रुपये काढून दुकानदाराला देऊ केले. मात्र, दुकानदाराने आदरापोटी पैसे घेण्यास नकार दिला. त्यावर पंतप्रधान मोदींनी आपल्या खास शैलीत त्या दुकानदाराची समजूत काढली. “नाही दादा, असं नसतं. त्रास घेऊ नको, पैसे घे,” असं म्हणत त्यांनी दुकानदाराला पैसे घेण्यास भाग पाडले.
सोशल मीडियावर व्हिडीओची चर्चा
पंतप्रधानांनी या खास क्षणांचा व्हिडीओ आपल्या ‘X’ (ट्विटर) हँडलवर शेअर केला आहे. “पश्चिम बंगालमधील चार सभांमधून वेळ काढून झाडग्राममध्ये स्वादिष्ट झालमुडीचा आस्वाद घेतला,” असे कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिले आहे. निवडणूक प्रचाराच्या धामधुमीत पंतप्रधानांचा हा साधेपणा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
