Wednesday, July 30, 2025
HomeBlogप्रेम, श्रद्धा आणि निष्ठेचा अनोखा संगम; पतीच्या आठवणींसोबत आजीनं पूर्ण केली पंढरपूर...

प्रेम, श्रद्धा आणि निष्ठेचा अनोखा संगम; पतीच्या आठवणींसोबत आजीनं पूर्ण केली पंढरपूर वारी

प्रेम, श्रद्धा आणि निष्ठेचा अनोखा संगम; पतीच्या आठवणींसोबत आजीनं पूर्ण केली पंढरपूर वारी

पंढरपूर प्रतिनिधी l आषाढी एकादशी म्हटलं की पंढरपूरची वारी, विठ्ठलनामाचा गजर, अभंगवाणी आणि भक्तांची अखंड श्रद्धा आठवते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी पायी चालत विठोबा भेटीसाठी पंढरपुरला येतात. ही वारी केवळ प्रवास नसून श्रद्धेचा, प्रेमाचा आणि निष्ठेचा उत्सव आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे एका आजीनं.

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एका वृद्ध आजींचा फोटो आणि त्याची कथा प्रचंड व्हायरल होत आहे. या आजी दरवर्षी आपल्या पतीसोबत पंढरपूर वारी करत असत. मात्र, यावर्षी त्यांच्या जीवनसाथीनं वाटेतच त्यांची साथ सोडली आणि ते या जगातून कायमचे निघून गेले. पतीच्या निधनानंतर अनेकांना ही वारी सोडून देणं सहज वाटलं असतं, पण या आजीनं तसं केलं नाही.

पतीच्या आठवणींसह, त्यांच्या फोटोला आपल्या हृदयाशी घट्ट कवटाळत, आजीनं यंदाही वारी पूर्ण केली. वाटेत अभंग गात, विठ्ठलनामाचा गजर करत आणि पतीच्या आठवणींना सोबत घेत त्यांनी पंढरपूर गाठलं. चंद्रभागेच्या पवित्र जलात स्नान करताना त्यांनी आपल्या पतीच्या फोटोलाही स्नान घातलं. हा क्षण पाहणाऱ्यांच्या डोळ्यांत नकळत पाणी आलं आणि अंगावर रोमांच उभे राहिले.

काही नात्यांना शब्दांची गरज नसते, त्यांना फक्त भावना आणि श्रद्धेची जोड असते. या आजीनं हेच दाखवून दिलं – प्रेम कधीच संपत नाही, फक्त व्यक्ती बदलते, भावना कायम राहतात.

वारकरी चळवळीतील ही घटना केवळ प्रेमाचं नाही तर श्रद्धेचं आणि निष्ठेचं अनोखं उदाहरण ठरली आहे.

ताज्या बातम्या