जुन्या बसस्थानक परिसरातील संघवी पाईपच्या इलेक्ट्रिक पॅनलला आग; अग्निशमन दलाच्या सतर्कतेने अनर्थ टळला
जळगाव | प्रतिनिधी शहरातील जुन्या बसस्थानकासमोरील ‘ संघवी पाईप’ या ठिकाणी असलेल्या इलेक्ट्रिक पॅनलला शनिवारी सकाळी अचानक आग लागली. मात्र, अग्निशमन दलाने तत्परता दाखवत घटनास्थळी धाव घेतली आणि आधुनिक अग्निशमन उपकरणांचा वापर करून आगीवर वेळीच नियंत्रण मिळवले. दलाच्या या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला असून परिसरातील दुकानांचे होणारे नुकसान वाचले आहे. दरम्यान या आगीमध्ये दुकान मालकाचे हजारो रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी १८ एप्रिल रोजी सकाळी ८:५५ वाजेच्या सुमारास हर्षल जैन यांनी अग्निशमन विभागाला या आगीबाबत दूरध्वनीवरून माहिती दिली. जुन्या बसस्थानकासमोर सांगवी पाईप येथील इलेक्ट्रिक पॅनलमध्ये अचानक ठिणग्या पडून आग लागल्याचे समोर आले. वर्दळीच्या ठिकाणी ही घटना घडल्याने परिसरात काही काळ घबराट निर्माण झाली होती.
खबर मिळताच अग्निशमन दलाचे वाहन काही मिनिटांतच घटनास्थळी दाखल झाले. इलेक्ट्रिक पॅनलची आग असल्याने पाण्याचा वापर करणे धोक्याचे होते, हे ओळखून पथकाने अत्यंत कौशल्याने DCP (Dry Chemical Powder) फायर एस्टिंगुशरचा वापर केला. जवानांच्या शर्थीच्या प्रयत्नांमुळे ही आग काही वेळातच पूर्णपणे विझवण्यात यश आले. या यशस्वी मोहिमेत वाहन चालक प्रकाश चव्हाण, मयूर ओतारी, फायरमन भूषण पाटील, नितीन ससाने आणि रूपेश पाटील यांनी मोलाची भूमिका बजावली. इलेक्ट्रिक पॅनलमधील शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाकडून वर्तवण्यात येत आहे.
