मुंबईत भाजपाचाच महापौर ; कुठलीही तडजोड करू नका
भाजपच्या दिल्लीतील पक्षश्रेष्ठींचे मुख्यमंत्र्यांना स्पष्ट आदेश
मुंबई (प्रतिनिधी): “मुंबईत भाजपचाच महापौर होईल,” असा ठाम आदेश भाजपच्या दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली असून, त्यामुळं मुंबई महानगरपालिकेतील सत्तास्थापनेच्या प्रक्रियेत मोठी खळबळ उडाली आहे. भाजप–शिवसेना (शिंदे गट) महायुतीने स्पष्ट बहुमत मिळवले असले तरी महापौरपदावरून निर्माण झालेला पेच आता अधिक तीव्र होताना दिसत आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपने सर्वाधिक ८९ जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष म्हणून आपली ताकद सिद्ध केली आहे, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने २९ जागा मिळवल्या आहेत. बहुमताचा ११४ चा आकडा गाठण्यासाठी भाजपला शिवसेनेची साथ आवश्यक असली, तरी महापौरपदावर भाजपचाच हक्क असल्याची ठाम भूमिका दिल्लीतील नेतृत्वाने घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महापौरपदाबाबत कोणतीही तडजोड न करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आल्याचे समजते.
दरम्यान, शिवसेनेकडून अडीच वर्षांसाठी महापौरपद देण्याची मागणी पुढे आली असून, स्थायी समितीसह इतर महत्त्वाच्या समित्यांमध्येही सन्मानजनक वाटा मिळावा, अशी भूमिका शिवसेना नेत्यांनी मांडली आहे. या मागण्यांमुळे महायुतीतील अंतर्गत तणाव उफाळून आला असून, राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दावोस दौऱ्यावर असल्याने प्रत्यक्ष चर्चा अद्याप झालेल्या नाहीत. मात्र, दिल्लीतील नेतृत्वाने स्पष्ट संदेश देत भाजप सर्वात मोठा पक्ष असल्याने महापौरपदावर आपलाच हक्क असल्याची भूमिका मित्रपक्षांसमोर ठामपणे मांडण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचवेळी, महायुतीतील संबंध बिघडू नयेत याचीही काळजी घेण्याचे सूतोवाच करण्यात आले असल्याचे समजते.
महापौरपदाचा पेच सोडवण्यासाठी लवकरच दिल्लीत भाजप आणि शिवसेना नेत्यांची महत्त्वाची बैठक होणार आहे.
