महापौरपदी दीपमाला काळे, उपमहापौरपदी मनोज चौधरी यांची बिनविरोध निवड
मंत्री गिरीश महाजन व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून नावांवर शिक्कामोर्तब
जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर महायुतीने महापौर व उपमहापौर पदांसाठी उमेदवारांची घोषणा केली असून, महापौरपदी दीपमाला मनोज काळे तर उपमहापौरपदी मनोज सुरेश चौधरी यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. सोमवारी अर्ज भरण्याच्या काही वेळ आधी भाजपचे ज्येष्ठ नेते व मंत्री गिरीश महाजन तसेच शिवसेना (शिंदे गट) चे नेते व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी या नावांवर शिक्कामोर्तब केले. दोन्ही उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने त्यांची बिनविरोध निवड होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. येत्या ६ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या विशेष महासभेत या निवडीवर अधिकृतरीत्या शिक्कामोर्तब होणार आहे.

नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत भाजपने ४६ जागांवर विजय मिळवत महापालिकेत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. शिवसेना (शिंदे गट) ला २२ जागा मिळाल्या असून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) व एका अपक्ष नगरसेवकाच्या पाठिंब्यामुळे महायुतीचे एकूण संख्याबळ ७० वर पोहोचले आहे. या भक्कम बहुमतामुळे महापौरपद भाजपकडे आणि उपमहापौरपद शिवसेनेकडे जाणार, हे आधीच स्पष्ट झाले होते. सोमवारी सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पार पडली. महायुतीकडून केवळ दोनच अर्ज आल्याने ही प्रक्रिया औपचारिक ठरली.
अर्ज दाखल करताना दीपमाला काळे व मनोज चौधरी यांच्यासमवेत आमदार राजूमामा भोळे, आमदार मंगेश चव्हाण, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, नगरसेविका शुचिता हाडा, अमर जैन, शाम कोगटा यांच्यासह महायुतीचे अनेक ज्येष्ठ नेते व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी महापालिका परिसरात कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी करत जल्लोष केला.
महापौरपदासाठी अनेक इच्छुक असतानाही दीपमाला काळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करून पक्षाने ज्येष्ठतेला प्राधान्य दिल्याचे स्पष्ट झाले. यासंदर्भात मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले की, सध्या संधी न मिळालेल्या नगरसेवकांना पुढील टप्प्यात महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या जातील. यामुळे पक्षांतर्गत नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
दरम्यान, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नगरसेवकांना आपापसातील गटतट व मतभेद विसरून जळगावच्या विकासासाठी एकत्र काम करण्याचे आवाहन केले. तर मंत्री गिरीश महाजन यांनी एकजुटीने काम केल्यास जळगावचा चेहरामोहरा बदलणे शक्य असल्याचा विश्वास व्यक्त केला. अनुभवी नेतृत्व असलेल्या दीपमाला काळे यांच्या माध्यमातून रखडलेल्या विकासकामांना नवी गती मिळेल, अशी अपेक्षा जळगावकरांकडून व्यक्त होत आहे.
