जळगाव मनपा निवडणुकीसाठी महायुतीचे उद्या भव्य शक्तीप्रदर्शन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रोड शोचे आयोजन
जळगाव (प्रतिनिधी): जळगाव शहर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराने आता उच्चांक गाठला असून, महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ उद्या मंगळवार, ६ जानेवारी रोजी राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांचा भव्य ‘रोड शो’ आयोजित करण्यात आला आहे. या रोड शोच्या माध्यमातून महायुती शहरात आपले विराट शक्तीप्रदर्शन करणार असून, प्रचाराची धुरा आता थेट राज्याच्या सर्वोच्च नेतृत्वाकडे आली आहे.
भाजप जिल्हा प्रसिद्धी प्रमुख (जळगाव जिल्हा महानगर) मनोज भांडारकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांचा हा रोड शो मंगळवारी दुपारी ३ वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून सुरू होईल. त्यानंतर हा रोड शो नेहरू चौक, लालबहादूर शास्त्री टॉवर, चित्रा चौक आणि गोलाणी मार्केट या शहरातील मुख्य बाजारपेठेतून मार्गस्थ होईल. या भव्य रॅलीचा समारोप पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथेच होणार आहे.
या ऐतिहासिक रोड शोमध्ये महायुतीचे सर्व ७५ उमेदवार, प्रमुख पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. महायुतीने या निवडणुकीत विकासकामांचा मुद्दा अग्रक्रमाने मांडला असून, मुख्यमंत्र्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीमुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला आहे. शहरातील मुख्य मार्गांवरून जाणाऱ्या या रोड शोच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने चोख बंदोबस्त तैनात केला असून, महायुतीच्या वतीने जळगावकरांना या रोड शोमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
