Thursday, February 5, 2026
HomeBlogप्रभाग १३ मध्ये महायुतीचे उमेदवार जाहीर; बंडखोरांना जिल्हाध्यक्षांचा कडक इशारा

प्रभाग १३ मध्ये महायुतीचे उमेदवार जाहीर; बंडखोरांना जिल्हाध्यक्षांचा कडक इशारा

प्रभाग १३ मध्ये महायुतीचे उमेदवार जाहीर; बंडखोरांना जिल्हाध्यक्षांचा कडक इशारा

जळगाव: जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक १३ मधील राजकीय चित्र आता स्पष्ट झाले असून, भारतीय जनता पक्षाने महायुतीच्या अधिकृत उमेदवारांची घोषणा केली आहे. या घोषणेसोबतच पक्षादेश डावलून अपक्ष म्हणून मैदानात उतरलेल्या बंडखोर उमेदवारांना जिल्हाध्यक्षांनी कडक शब्दांत इशारा दिला आहे. स्वतःला भाजपचेच उमेदवार भासवून मतदारांची दिशाभूल करणाऱ्यांवर येत्या दोन दिवसांत कठोर कारवाईचा बडगा उगारला जाईल, असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.

​प्रभाग क्रमांक १३ मध्ये भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपाई या महायुतीचे अधिकृत उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये १३ ‘अ’ गटातून भाजपचे नितीन प्रभाकर सपके, १३ ‘ब’ गटातून भाजपच्या सौ. सुरेखा नितीन तायडे हे उमेदवार असून १३ ‘क’ गटातून सौ. वैशाली अमित पाटील यांची आधीच बिनविरोध निवड झाली आहे. तसेच १३ ‘ड’ गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रफुल्ल गुलाबराव देवकर हे महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत.

​पक्षाने सूचना देऊनही काही इच्छुकांनी आपली उमेदवारी मागे घेतलेली नाही. हे बंडखोर उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक लढवत असून, आपण भाजपचेच अधिकृत उमेदवार आहोत असा खोटा प्रचार करून मतदारांची दिशाभूल करत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा उमेदवारांनी तातडीने आपली भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा पक्षाच्या शिस्तीचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असे जिल्हाध्यक्षांनी बजावले आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मतदारांनी कोणत्याही भूलथापांना बळी न पडता महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच विजयी करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

ताज्या बातम्या