Friday, July 3, 2026
Homeक्राईमचोपडा-लासूर रस्त्यावर पोलिसांचा थरारक सापळा; आंतरजिल्हा कट्टा तस्कर टोळी गजाआड, ६ लाखांचा...

चोपडा-लासूर रस्त्यावर पोलिसांचा थरारक सापळा; आंतरजिल्हा कट्टा तस्कर टोळी गजाआड, ६ लाखांचा मुद्देमाल जप्त!

चोपडा-लासूर रस्त्यावर पोलिसांचा थरारक सापळा; आंतरजिल्हा कट्टा तस्कर टोळी गजाआड, ६ लाखांचा मुद्देमाल जप्त!

२ मॅगझिन आणि गावठी पिस्तुलासह ३ जणांना बेड्या ; एलसीबी चोपडा पोलिसांची संयुक्त कारवाई

 

 

जळगाव: प्रतिनिधी जिल्ह्यात अवैध शस्त्रास्त्रांची तस्करी करणाऱ्या आणि कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्या गुन्हेगारी टोळ्यांवर जळगाव पोलिसांनी पुन्हा एकदा मोठा प्रहार केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) चोपडा शहर पोलिसांच्या संयुक्त मदतीने एका हायवेवरील थरारक कारवाईत आंतरजिल्हा कट्टा तस्कर टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत. या धडक मोहिमेत पोलिसांनी १ घातक गावठी कट्टा (पिस्तूल), २ मॅगझिन, ३ मोबाईल आणि तस्करीसाठी वापरली जाणारी कार असा एकूण ६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
शनिमंदिर परिसरात मध्यरात्री फिल्मी सापळा
१ जुलै रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला एक अत्यंत खात्रीशीर आणि गोपनीय माहिती मिळाली होती की, काही संशयित इसम एका कारमधून विनापरवाना घातक शस्त्र घेऊन लासूर-चुंचाळे मार्गे चोपडा शहराच्या दिशेने येत आहेत. माहिती मिळताच जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशाने एलसीबी आणि चोपडा शहर पोलिसांचे संयुक्त पथक तात्काळ ॲक्शन मोडमध्ये आले. पथकाने चोपडा-लासूर-चुंचाळे रस्त्यावरील शनीमंदिर परिसरात दबा धरून विळखा घातला. सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास संशयास्पद हुंडाई इऑन कार येताच पोलिसांनी तिला चहुबाजूंनी घेरून थांबवले.
मागील सीटखाली दडवले होते हत्यार; अशी झाली झडती
पोलिसांनी पंचांसमक्ष कारची कसून झडती घेण्यास सुरुवात केली. सुरुवातीला काहीच न आढळल्याने संशयितांनी पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसी खाक्या दाखवताच कारच्या मागील सीटच्या खालून ६० हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा व मॅगझिन आणि १० हजार रुपयांचे अतिरिक्त मॅगझिन असा घातक शस्त्रसाठा हस्तगत करण्यात आला. यासोबतच ५ लाख रुपयांची कार (एमएच-२०-ईई-६१०३) आणि ३० हजार रुपयांचे ३ मोबाईल फोन जप्त करण्यात आले.

संभाजीनगर आणि पाचोऱ्याचे तस्कर जाळ्यात
या कारवाईत पोलिसांनी तीन अट्टल तस्करांना अटक केली आहे, ज्यांचे जाळे थेट शेजारील जिल्ह्यात पसरलेले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे खालीलप्रमाणे आहेत:
१) ज्ञानेश्वर रामकृष्ण माळी (वय ३९), रा. कुऱ्हाड खुर्द, ता. पाचोरा, जि. जळगाव.
२) सचिन रोशन पवार (वय ३४), रा. मयूर पार्क कॉलनी, गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर.
३) अनिल कचरे साळुंखे (वय ३७), रा. जाधव गल्ली, गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर.

चोपडा शहर पोलिसांत गुन्हा दाखल
या प्रकरणी आरोपींविरुद्ध चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २८५/२०२६ अन्वये भारतीय हत्यार कायदा (आर्म्स ॲक्ट) कलम ३/२५ प्रमाणे गंभीर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हे शस्त्र कोठून आणले होते आणि ते जळगाव जिल्ह्यात कोणाला विकले जाणार होते, याचा सखोल तपास आता चोपडा शहर पोलीस करत आहेत.

या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात यशस्वी मोहीम
ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या थेट मार्गदर्शनाखाली पार पडली.  ही कारवाई एलसीबीचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड आणि चोपडा शहर पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्या संयुक्त पथकाने केले. जळगाव पोलिसांच्या या धडाक्यामुळे बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांचे धाबे dणाणले आहेत.

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या