JCL T-20 रोमांच: जामनेर आणि जळगाव कोगटा किंग्सची गुणतालिकेत झेप; अमळनेरचीही रावेरवर मात
प्रद्युम महाजन, बिपिन चांगरे आणि रणजीत निकम ठरले विजयाचे शिल्पकार; रावेर रॉयल्सची सलग तिसरी हार
जळगाव | प्रतिनिधी जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने कांताई नगर येथील जैन ड्रीम स्पेसेसच्या मैदानावर सुरू असलेल्या ‘जळगाव क्रिकेट लीग-२०२६’ (JCL T-20) मध्ये मंगळवारी झालेल्या सामन्यांत जामनेर सातपुडा हिरोज आणि जळगाव कोगटा किंग्स या संघांनी वर्चस्व गाजवत विजय मिळवले. त्यापूर्वी सोमवारी रात्री झालेल्या सामन्यात अमळनेर सुहास जायंट्सने स्पर्धेतील आपला पहिला विजय नोंदवला. या निकालांमुळे आता उपांत्य फेरी गाठण्यासाठी सर्व संघांमध्ये चुरस निर्माण झाली असून गुणतालिकेत मोठी उलथापालथ झाली आहे.
जामनेरचा ८ गडी राखून दणदणीत विजय
मंगळवारी दुपारी झालेल्या सामन्यात जामनेर सातपुडा हिरोजने अमळनेर सुहास जायंट्सचा ८ गडी राखून पराभव केला. अमळनेरने प्रथम फलंदाजी करताना शुभम शर्माच्या ६० धावांच्या जोरावर १५२ धावा केल्या होत्या. जामनेरच्या गोलंदाजांनी अचूक टप्पा राखत अमळनेरच्या सात फलंदाजांना १०२ धावांतच तंबूत धाडले होते. विजयासाठी १५३ धावांचे आव्हान जामनेरने अवघ्या १७.४ षटकांत पूर्ण केले. सामनावीर प्रद्युम महाजन याने ४२ चेंडूत ६९ धावांची झंझावाती खेळी करत विजयाचा पाया रचला. त्याला रवींद्र (३१) आणि क्रिषी (३०) यांनी नाबाद खेळी करत चांगली साथ दिली.
जळगाव कोगटा किंग्सचा पुन्हा एकदा डंका
दिवसाच्या पहिल्या सामन्यात जळगाव कोगटा किंग्सने रावेर रॉयल्सला पराभूत करत स्पर्धेतील तिसरा विजय साजरा केला. रावेर रॉयल्सने प्रथम फलंदाजी करताना १४३ धावा केल्या होत्या. यात अशपाक शेखने सर्वाधिक ४५ धावांचे योगदान दिले. कोगटा किंग्सकडून कर्णधार जगदीश झोपे आणि बिपिन चांगरे यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. १४४ धावांचे लक्ष्य कोगटा किंग्सने १५.१ षटकांत ३ गड्यांच्या मोबदल्यात गाठले. ओम भोसलेने नाबाद ६४ धावा केल्या, तर बिपिन चांगरे याने २५ चेंडूत ५२ धावांची वेगवान खेळी करत सामनावीराचा किताब पटकावला.
अमळनेरची रावेरवर मात
सोमवारी रात्री झालेल्या सामन्यात अमळनेर सुहास जायंट्सने रावेर रॉयल्सविरुद्ध २०१ धावांचा डोंगर उभा केला होता. रणजीत निकम (५५), मानव टीब्रेवाला (५४) आणि ऋषी यादवने (३७) यांच्या फलंदाजीमुळे अमळनेरने हा टप्पा गाठला. प्रत्युत्तरात रावेर रॉयल्सचा डाव १६४ धावांवर मर्यादित राहिला. अमळनेरच्या रणजीत निकम याला त्याच्या अष्टपैलू कामगिरीसाठी सामनावीर घोषित करण्यात आले. रावेर रॉयल्सचा हा सलग तिसरा पराभव ठरला आहे.
उद्याचे रणसंग्राम (२२ एप्रिल):
लीग टप्प्यातील चुरस वाढली असून आज, बुधवारी सकाळी ८:३० वाजता रावेर रॉयल्स विरुद्ध पाचोरा एसकेटी योद्धाज, दुपारी ३ वाजता अमळनेर सुहास जायंट्स विरुद्ध चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स आणि सायंकाळी ७:३० वाजता जळगाव कोगटा किंग विरुद्ध जामनेर सातपुडा हिरोज यांच्यात सामने रंगणार आहेत.
