Tuesday, August 4, 2026
Homeक्रीडाJCL T-20 रोमांच: पाचोरा, चाळीसगाव आणि जामनेरचे ‘मैदानी’ यश; कोगटा किंग्सचा अश्वमेध...

JCL T-20 रोमांच: पाचोरा, चाळीसगाव आणि जामनेरचे ‘मैदानी’ यश; कोगटा किंग्सचा अश्वमेध रोखला!

JCL T-20 रोमांच: पाचोरा, चाळीसगाव आणि जामनेरचे ‘मैदानी’ यश; कोगटा किंग्सचा अश्वमेध रोखला!

​कैलास पाटील, अमेय कोळी आणि मितालेश चौधरी ठरले सामन्याचे मानकरी; शहरात थेट प्रक्षेपणाची धूम

​जळगाव | प्रतिनिधी जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित ‘जळगाव क्रिकेट लीग-२०२६’ (JCL T-20) चा थरार सध्या कांताई नगर येथील जैन ड्रीम स्पेसेसच्या मैदानावर टिपेला पोहोचला आहे. सोमवारी झालेल्या सामन्यांमध्ये पाचोरा एसकेटी योद्धाज आणि चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स या संघांनी रोमहर्षक विजय मिळवले, तर रविवारी रात्री झालेल्या सामन्यात जामनेर सातपुडा हिरोजने आपला दबदबा निर्माण केला. विशेष म्हणजे, सलग दोन विजय मिळवणाऱ्या जळगाव कोगटा किंग्स आणि जामनेर संघांच्या विजयाची मालिका प्रतिस्पर्ध्यांनी खंडित केली आहे.

पाचोरा योद्धाजचा कोगटा किंग्सवर थरारक विजय

​सलग दोन सामने जिंकणाऱ्या जळगाव कोगटा किंग्सने सोमवारी प्रथम फलंदाजी करताना १७५ धावांचे आव्हान उभे केले. मनीष चव्हाण याने ३५ चेंडूत नाबाद ५८ धावांची झंझावाती खेळी करून संघाला सावरले. मात्र, पाचोरा एसकेटी योद्धाजने हे आव्हान सात गडी राखून पार केले. कैलास पाटील याने ४९ चेंडूत नाबाद ७७ धावांची मॅचविनिंग खेळी केली, तर सिद्धेश देशमुख याने ५१ धावांचे योगदान दिले. शेवटच्या षटकात ६ धावांची गरज असताना पाचोऱ्याने पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकत विजय सुकर केला. कोगटा किंग्सचा या स्पर्धेतील हा पहिलाच पराभव ठरला.

अमेय कोळीच्या खेळीने चाळीसगावची बाजी

​सकाळच्या सत्रात जामनेर सातपुडा हिरोज आणि चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स यांच्यात लढत झाली. जामनेरने २० षटकांत १५८ धावा केल्या होत्या. यात रवींद्रच्या ६८ धावांचा मोलाचा वाटा होता. प्रत्युत्तरात चाळीसगावने १९.३ षटकांत १६२ धावा करत विजय नोंदवला. सामनावीर अमेय कोळी (६६ धावा) आणि साहिल गायकर (४६ धावा) यांच्या फलंदाजीच्या जोरावर चाळीसगावने जामनेरची विजयाची हॅट्ट्रीक रोखली.

रावेर रॉयल्सवर सातपुडा हिरोजचा ‘विराट’ विजय

​रविवारी रात्री झालेल्या सामन्यात जामनेर सातपुडा हिरोजने रावेर रॉयल्सचा ६८ धावांनी धुव्वा उडवला. प्रथम फलंदाजी करताना जामनेरने १८२ धावांचा डोंगर उभारला होता. यात मितालेश चौधरी याने ४६ चेंडूत नाबाद ७० धावा कुटल्या. या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना रावेरचा संघ अवघ्या ११४ धावांत गारद झाला. मितालेश चौधरीला त्याच्या धडाकेबाज खेळीसाठी सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

मोठ्या पडद्यावर थेट प्रक्षेपणाची मेजवानी

​मैदानावर प्रेक्षकांची गर्दी होत असतानाच, शहरातील क्रिकेट प्रेमींसाठी जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन यांनी विशेष व्यवस्था केली आहे. काव्यरत्नावली चौक आणि नेहरू चौक येथे मोठ्या पडद्यावर सामन्यांचे थेट प्रक्षेपण केले जात असून, शेकडो जळगावकर या सुविधेचा लाभ घेत आहेत.

आजचे रणसंग्राम (२१ एप्रिल):

​सकाळी ८:३०: जळगाव कोगटा किंग वि. रावेर रॉयल्स
​दुपारी ३:००: जामनेर सातपुडा हिरोज वि. अमळनेर सुहास जायंट्स
​सायंकाळी ७:३०: पाचोरा एसकेटी योद्धाज वि. चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स
​अशी आहे गुणतालिका (सोमवार रात्री ८ पर्यंत):

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या