‘आयुष्यात काही कमावले नाही तरी चालेल, पण गमावू नका’ – डॉ. महेश्वर रेड्डी
जळगाव पोलीस दलातर्फे नूतन व मावळत्या अधीक्षकांचा जंगी सत्कार; निरोप समारंभात पोलीस अधिकारी झाले भावूक
जळगाव | प्रतिनिधी पोलीस दलात काम करताना अनेकदा कामाच्या व्यापात नकळत चुका होतात. अशा वेळी संबंधित कर्मचाऱ्याचा हेतू लक्षात घेऊन मी अनेकांना सांभाळून घेतले. या जिल्ह्यात निवांत बसण्यासाठी वेळ नाही. आयुष्यात एकदाचे काही कमावले नाही तरी चालेल, पण माणुसकी गमावू नका. दैनंदिन कर्तव्य पार पाडताना ‘आत्मिक समाधानासाठी’ काम करा,” असा मोलाचा आणि भावनिक सल्ला मावळते पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिला.
जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची पुणे सीआयडी येथे बदली झाली असून, त्यांच्या जागी धुळे येथून आलेले श्रीकांत धिवरे यांनी पदभार स्वीकारला आहे. या निमित्त बुधवारी (दि. २२ एप्रिल) नियोजन भवनातील सभागृहात जिल्हा पोलीस दल व जळगावच्या नागरिकांच्या वतीने भव्य निरोप व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
जळगावची टीम ‘द बेस्ट’: डॉ. रेड्डी
आपल्या निरोप समारंभात बोलताना डॉ. रेड्डी काहीसे भावूक झाले होते. त्यांनी जळगावातील आठवणींना उजाळा देत म्हटले की, “रुजू झाल्यापासून शेवटच्या दिवसापर्यंत हा जिल्हा संवेदनशील राहिला. मात्र, सर्वसामान्य आणि गरीब व्यक्तीला न्याय मिळवून देण्यासाठी मी नेहमीच स्वतः प्रभारी अधिकाऱ्यांना फोन करून सूचना दिल्या. कोणालाही विनाकारण त्रास होणार नाही, याची काळजी घेतली. जळगावची ही पोलीस टीम खऱ्या अर्थाने ‘द बेस्ट’ आहे.”
जनतेच्या सहभागाशिवाय गुन्हेगारी संपणार नाही: श्रीकांत धिवरे
नूतन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी आपल्या २२ वर्षांच्या प्रदीर्घ पोलीस सेवेचा अनुभव कथन केला. ते म्हणाले की, “वरिष्ठ स्तरावरील बैठकीत जळगाव जिल्ह्याची कामगिरी नेहमीच उजवी राहिली आहे. मात्र, केवळ कायद्याने गुन्हेगारी थांबत नाही; त्यासाठी समाजाचा सक्रिय सहभाग अनिवार्य आहे. आगामी काळात जनतेला सोबत घेऊन गुन्हेगारीवर वचक बसवण्यास माझे प्राधान्य असेल.”
समन्वयातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न हाताळला – जिल्हाधिकारी रोहन घुगे
सर्वच बाबतीत हा जिल्हा संवेदनशील असून याठिकाणी नेहमी घडामोडी घडत असतात. डॉ. रेड्डी हे जिल्ह्यात आल्यापासून शेवटच्या दिवसापर्यंत याठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न त्यांनी हाताळला. महसूल आणि पोलीस विभागातील अधिकाऱ्यांच्या समन्वयातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न हाताळणार असल्याचे म्हणत जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी मावळते पोलीस अधीक्षक डॉ. रेड्डी व नूतन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांचा सत्कार करीत शुभेच्छा दिल्या
हा जिल्हा संवेदनशील असून याठिकाणी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याकरीता निर्णय घेतांना कसोटी लागते. परंतू दोन वर्षाच्या काळात पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी अनेक प्रसंगांना सामोरे जावून पोलीस दलाची प्रतिमा चांगली ठेवण्याचा प्रयत्न केला. तसेच पोलीस दलात बदली प्रक्रिया राबवितांना निर्णय घेण्याची क्षमता निर्णायक होती असे अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत यावेळी म्हणाले.
खंबीर नेतृत्व आणि निर्णयांमुळे काम करतांना बळ -कविता नेरकर
माझी देखील बदली होणार असल्याने मी देखील बदलीसाठी तयार आहे. डॉ. रेड्डीसोंबत काम करतांना दोनवर्ष कधी निघून गेली हे कळलेच नाही. खंबीर नेतृत्व आणि निर्णयांमुळे काम करतांना बळ मिळाले. पोलीस अधीक्षक हे वैयक्तिक आयुष्यात खूप संवेदनशील आहेत. यापुढे देखील तुम्ही पाठीवर हात ठेवून लढ म्हणालात, तर लगेच लढणार असे म्हणत अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांनी त्यांच्योबत कात करतांना घडलेल्या घटनांना उजाळा दिला.
या सोहळ्यात विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मनोगत व्यक्त करणाऱ्यांमध्ये माजी उपनगराध्यक्ष करीम सालार, हरिश्चंद्र सोनवणे, कानळदा सरपंच पुंडलीक सपकाळे, सामाजिक कार्यकर्ते अयाज अली, इंडियन रेडक्रॉसचे उपाध्यक्ष गनी मेमन, पत्रकार किशोर पाटील, पोलीस कर्मचारी रतन गिते, सुनील दामोदर, कार्यालयीन कर्मचारी सुरेश ठाकूर, मुकेश सोनवणे, एलसीबीचे उपनिरीक्षक शरद बागल, नशिराबाद पोलीस ठाण्याच्या सहाय्यक निरीक्षक योगिता नारखेडे, कासोदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक श्रीकांत पाटील, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक बबन आव्हाड, चोपडा उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप आणि भुसावळ उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांचा समावेश होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमित माळी यांनी केले, तर आभार प्रदर्शन एलसीबीचे निरीक्षक राहुल गायकवाड यांनी केले.
