Saturday, March 28, 2026
Homeखानदेशई-शासन सुधारणा स्पर्धेत जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय अव्वल

ई-शासन सुधारणा स्पर्धेत जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय अव्वल

ई-शासन सुधारणा स्पर्धेत जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय अव्वल

१५० दिवसांच्या उपक्रमात राज्यात प्रथम क्रमांक; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव

जळगाव प्रतिनिधी) : राज्य प्रशासन अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि गतिमान करण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या १५० दिवसांच्या ई-शासन सुधारणा कार्यक्रमात जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात पार पडलेल्या विशेष सोहळ्यात जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.


गुणांकनात चमकदार यश
भारतीय गुणवत्ता परिषदेमार्फत (क्यूसीआय) करण्यात आलेल्या सर्वंकष मूल्यमापनात जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने २०० पैकी तब्बल १८८ गुण मिळवले. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रशासन अधिक परिणामकारक करण्याच्या दृष्टीने जिल्ह्याने सात महत्त्वाच्या निकषांवर प्रभावी कामगिरी नोंदवली.


तंत्रज्ञानाच्या जोरावर प्रशासन गतिमान
या उपक्रमांतर्गत अद्ययावत व नागरिकाभिमुख संकेतस्थळ, ‘आपले सरकार’ प्रणालीची प्रभावी अंमलबजावणी, ई-ऑफिस प्रणालीचा शंभर टक्के वापर, कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी डॅशबोर्ड, व्हॉट्सॲप चॅटबॉट सेवा, कृत्रिम बुद्धिमत्ता व ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर, तसेच भौगोलिक माहिती प्रणालीचा प्रभावी उपयोग यांसारख्या उपक्रमांचा समावेश आहे.

सादरीकरणातून मांडली यशोगाथा
या यशस्वी कामगिरीचे सविस्तर सादरीकरण जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी कार्यक्रमात केले. प्रशासनातील डिजिटल बदलांमुळे नागरिकांना अधिक सुलभ आणि वेगवान सेवा मिळत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

डिजिटल परिवर्तनाकडे ठाम पाऊल
या उपक्रमामुळे जळगाव जिल्हा प्रशासनाने डिजिटल प्रशासनाच्या दिशेने मोठी झेप घेतली असून, राज्यातील इतर जिल्ह्यांसाठी आदर्श निर्माण केला आहे.

“हे यश जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सांघिक प्रयत्नांचे फलित असून, ते जळगावकर नागरिकांना समर्पित आहे.”
— रोहन घुगे, जिल्हाधिकारी, जळगाव

ताज्या बातम्या