अग्निशमन दलाचे ‘सारथी’ देविदास सुरवाडे यांचा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते गौरव!
उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मानपत्र; जळगावकरांकडून कौतुकाचा वर्षाव
जळगाव | प्रतिनिधी
जळगाव महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागातील कर्तव्यदक्ष वाहन चालक देविदास सिताराम सुरवाडे यांना त्यांच्या उत्कृष्ट आणि समर्पित सेवेबद्दल जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते विशेष सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय सोहळ्यात हा गौरव सोहळा पार पडला.

संकटाच्या काळात तत्पर सेवा
अग्निशमन दलात वाहन चालक म्हणून कार्यरत असताना देविदास सुरवाडे यांनी अनेकदा जीवावर उदार होऊन आगीच्या घटनांमध्ये आपली जबाबदारी पार पाडली आहे. नुकत्याच शहरात घडलेल्या आयटीआय परिसरातील चायनीज गाड्यांची आग असो किंवा देवरामनगरमधील घराला लागलेली आग; या प्रत्येक वेळी सुरवाडे यांनी अत्यंत वेगाने अग्निशमन बंब घटनास्थळी पोहोचवून आग विझविण्याकामी मदत करून मोठा अनर्थ टाळला होता. त्यांच्या याच तत्परतेची दखल घेत महानगरपालिका प्रशासनाने त्यांच्या नावाची शिफारस या पुरस्कारासाठी केली होती.
पुरस्कार प्रदान करताना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी देविदास सुरवाडे यांच्या कामाचे कौतुक केले. “अग्निशमन दलाचे कर्मचारी हे शहराचे खऱ्या अर्थाने रक्षक आहेत. अशा शब्दांत पालकमंत्र्यांनी त्यांची पाठ थोपटली.
देविदास सुरवाडे यांना मिळालेल्या या सन्मानामुळे जळगाव महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाची मान उंचावली आहे. त्यांच्या या यशाबद्दल अग्निशमन दलातील त्यांचे सहकारी संतोष तायडे, रोहिदास चौधरी, योगेश पाटील, ऋषभ सुरवाडे आणि इतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. “हा सन्मान केवळ माझा नसून माझ्या संपूर्ण टीमचा आहे,” अशी भावना यावेळी सुरवाडे यांनी व्यक्त केली.

जळगाव महापालिकेचे आयुक्त आणि लोकप्रतिनिधींनी देखील देविदास सुरवाडे यांचे अभिनंदन केले असून, त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
