Thursday, February 5, 2026
Homeखानदेशजळगाव मनपा निवडणूक : शिवसेनेचे डॉ. गौरव सोनवणे ‘प्रभाग १८ अ’ मधून...

जळगाव मनपा निवडणूक : शिवसेनेचे डॉ. गौरव सोनवणे ‘प्रभाग १८ अ’ मधून बिनविरोध

जळगाव मनपा निवडणूक : शिवसेनेचे डॉ. गौरव सोनवणे ‘प्रभाग १८ अ’ मधून बिनविरोध
जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक १८ ‘अ’ (अनुसूचित जमाती राखीव) मधून शिवसेनेचे उमेदवार डॉ. गौरव चंद्रकांत सोनवणे यांची बिनविरोध निवड जाहीर झाली आहे. भाजपच्या उमेदवाराच्या बिनविरोध विजयानंतर शिवसेनेनेही मतदानापूर्वीच यश मिळवल्याने शहरातील राजकीय हालचालींना वेग आला आहे.

प्रभाग १८ ‘अ’ मधील निवडणूक प्रक्रियेत सुरुवातीला डॉ. गौरव सोनवणे यांच्याविरोधात मयूर चंद्रशेखर सोनवणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीपूर्वी त्यांनी आपला अर्ज मागे घेतल्याने डॉ. सोनवणे यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अधिकृत घोषणा करताच शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महानगरपालिका परिसरात गुलालाची उधळण करत फटाक्यांच्या आतषबाजीत आनंदोत्सव साजरा केला.

युवा आणि उच्चशिक्षित नेतृत्वाला संधी
नवनिर्वाचित नगरसेवक डॉ. गौरव सोनवणे हे चोपडा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार चंद्रकांत सोनवणे यांचे सुपुत्र असून, वैद्यकीय क्षेत्रातील कार्यामुळे त्यांची प्रभागात वेगळी ओळख निर्माण झाली आहे.

सामाजिक बांधिलकी आणि आरोग्यविषयक उपक्रमांत सक्रिय सहभागामुळे नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल सकारात्मक प्रतिमा आहे. युवा नेतृत्वाला पुढे आणत शिवसेनेने या प्रभागात आपली संघटनात्मक ताकद अधोरेखित केली असून, या बिनविरोध विजयामुळे शिवसैनिकांचा उत्साह द्विगुणित झाला आहे.

ताज्या बातम्या