जळगावात अग्निशमन दलाची तत्परता; विहिरीत पडलेल्या बकरीला दिले जीवदान!
जवानांनी बकरीला सुखरूप काढले बाहेर
जळगाव | प्रतिनिधी शहरातील जुने जळगाव भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर परिसरात रविवारी सायंकाळी एका विहिरीत पडलेल्या बकरीला जळगाव महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने अत्यंत शिताफीने जिवंत बाहेर काढले. अग्निशमन दलाने दाखवलेल्या या तत्परतेचे परिसरात कौतुक होत आहे.
अशी मिळाली माहिती
रविवारी सायंकाळी ४:५५ वाजता माजी नगरसेवक श्री. राजेश सोनवणे यांची कन्या प्रिया सोनवणे यांनी सतर्कता दाखवत अग्निशमन विभागाला खबर दिली की, आंबेडकर नगरजवळील एका विहिरीत बकरी पडली आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, मुख्य अग्निशमन अधिकारी अश्वजीत घरडे यांच्या सूचनेनुसार तातडीने बचाव पथक घटनास्थळी रवाना झाले.
थरारक बचाव कार्य
विहीर खोल असल्याने बकरीला सुखरूप बाहेर काढणे हे जवानांसमोर मोठे आव्हान होते. मात्र, अग्निशमन दलाच्या पथकाने कोणतीही वेळ न घालवता विहिरीत उतरून बचाव कार्य सुरू केले. काही वेळातच त्या बकरीला जिवंत बाहेर काढण्यात जवानांना यश आले. आपली बकरी सुखरूप असल्याचे पाहून मालकीण निर्मला सोनवणे (आजीबाई) यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आणि जवानांचे आभार मानले.
या जवानांनी बजावली कामगिरी
या बचाव मोहिमेत वाहन चालक देविदास सुरवाडे, फायरमन भूषण पाटील, वृषभ सुरवाडे, गिरीश खडके, चेतन सपकाळे आणि भावेश मराठे या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
अग्निशमन दलाने केवळ मानवी जीवच नव्हे तर मुक्या प्राण्यांप्रती दाखवलेल्या या संवेदनशीलतेबद्दल जुने जळगाव परिसरातील नागरिकांनी त्यांचे कौतुक केले आहे.
