ऑनलाइन ट्रेडिंगच्या माध्यमातून मोठ्या नफ्याचे आमिष ; एकाची 15 लाखात फसवणूक
जळगाव: ऑनलाइन ट्रेडिंगच्या माध्यमातून मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून एका जळगावकराला १५ लाख ४० हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी ७ मे रोजी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना अज्ञात आरोपींनी मोबाईलद्वारे संपर्क साधून ‘SBI Securities Back End Trading System’ मध्ये गुंतवणूक केल्यास प्रचंड नफा मिळेल, असे आमिष दाखवले होते. संशयित आरोपींनी विविध मोबाईल क्रमांक आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यांना ‘ब्लॉक ट्रेडिंग’मध्ये पैसे गुंतवण्यास सांगून वेळोवेळी विविध बँक खात्यांवर रक्कम भरण्यास प्रवृत्त केले.
आरोपींच्या सांगण्यावर विश्वास ठेवून फिर्यादी यांनी एकूण १५ लाख ४० हजार रुपये ऑनलाइन पद्धतीने जमा केले. मात्र, काही काळानंतर गुंतवणुकीवर अपेक्षित असलेला नफा किंवा मूळ रक्कम परत मिळत नसल्याचे पाहून फिर्यादी यांनी आरोपींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली.
फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१८(४), ३(५) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या (IT Act) कलम ६६(डी) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. नागरिकांनी ऑनलाइन गुंतवणूक, ट्रेडिंग किंवा अवास्तव परताव्याच्या कोणत्याही आमिषाला बळी पडू नये, तसेच कोणतेही आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी संबंधित संस्थेची अधिकृतता तपासून घ्यावी, असे आवाहन सायबर पोलीस ठाण्यामार्फत करण्यात आले आहे.
