इराण प्रकरणावर प्रश्न विचारताच डोनाल्ड ट्रम्प भडकले; महिला पत्रकाराला थेट ‘गेट आऊट’चा आदेश!
भारतीय जहाजांवरील हल्ल्याचा विचारला होता जाब | “करार करा, अन्यथा वीज प्रकल्प उडवू”; इराणलाही दिला गर्भित इशारा
वॉशिंग्टन | वृत्तसंस्था इराण आणि इस्रायलमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा आक्रमक अवतार पाहायला मिळाला आहे. होर्मुजच्या समुद्रात भारतीय जहाजांवर झालेल्या हल्ल्याबाबत प्रश्न विचारणाऱ्या एका महिला पत्रकारावर ट्रम्प प्रचंड संतापले आणि त्यांनी भर पत्रकार परिषदेत तिला बाहेर जाण्यास सांगितले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ट्रम्प यांच्या वर्तनावर जगभरातून टीका होत आहे.
नेमकं प्रकरण काय?
CBS न्यूजच्या व्हाईट हाऊस रिपोर्टर ओलिविया रिनाल्डी यांनी १८ एप्रिल रोजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना इराणमधील सद्यस्थिती आणि होर्मुज सामुद्रधुनीतील ताज्या घडामोडींवर प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. विशेषतः इराणकडून दोन भारतीय जहाजांवर झालेल्या कथित हल्ल्याबाबत रिनाल्डी यांनी विचारणा केली. मात्र, हा प्रश्न विचारताच ट्रम्प यांचा संयम सुटला. त्यांनी संतप्त होऊन रिनाल्डी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना तात्काळ तेथून बाहेर जाण्याचे आदेश दिले.
रिनाल्डी यांनी हा व्हिडिओ शेअर करताना म्हटले की, “मी केवळ भारतीय जहाजांवर झालेल्या गोळीबाराबाबत विचारण्याचा प्रयत्न केला होता, पण राष्ट्राध्यक्षांनी मला बाहेर काढले.”
इराणला ‘अंतिम’ इशारा: “करार करा किंवा परिणाम भोगा”
पत्रकारावर संताप व्यक्त केल्यानंतर ट्रम्प यांनी इराणला कडक शब्दांत सुनावले आहे. “इराणने संघर्षविरामाचे गंभीर उल्लंघन केले आहे, तरीही शांतता करार अद्याप शक्य आहे. पण हा करार होणारच – मग तो चांगल्या मार्गाने होवो किंवा कठीण मार्गाने,” अशा शब्दांत ट्रम्प यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
इराणला आम्ही चांगली ऑफर दिली आहे, ती मान्य न केल्यास इराणी पूल आणि वीज प्रकल्पांवर हल्ले केले जाऊ शकतात, असा थेट इशाराही ट्रम्प यांनी दिला आहे. यामुळे आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थिती अधिकच गंभीर होण्याची चिन्हे आहेत.
कोण आहेत ओलिविया रिनाल्डी?
ओलिविया रिनाल्डी या CBS न्यूजमधील अनुभवी पत्रकार आहेत. त्यांनी २०२४ च्या अमेरिकन निवडणूक प्रचाराचे सविस्तर कव्हरेज केले आहे. यापूर्वी त्यांनी ‘सीबीएस इव्हनिंग न्यूज’मध्ये असोसिएट प्रोड्यूसर म्हणून काम केले असून, ३ वर्षे नोराह ओ’डॉनेल यांच्यासोबतही त्या कार्यरत होत्या. त्यांच्यासारख्या वरिष्ठ पत्रकारासोबत झालेल्या या वागणुकीमुळे अमेरिकन प्रसारमाध्यमांमध्ये नाराजीचा सूर आहे.
भारताची भूमिका
दरम्यान, इराणकडून भारतीय जहाजांना लक्ष्य केले गेल्याच्या वृत्तानंतर भारत सरकारने आधीच तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. याप्रकरणी इराणी राजदूतांकडे स्पष्टीकरण मागवण्यात आले असून, भारतीय नौदलही या भागातील हालचालींवर बारीक लक्ष ठेवून आहे.
