बॉलिवूडचा ‘ही-मॅन’ काळाच्या पडद्याआड !
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी ८९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास ; बॉलिवूडवर शोककळा
मुंबई प्रतिनिधी बॉलिवूडच्या सुवर्ण इतिहासातील झगमगता तारा आणि ‘ही-मॅन’ म्हणून लाखो चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचा आज वयाच्या ८९व्या वर्षी निधनाने जीवनप्रवास संपला आहे. आज, २४ नोव्हेंबर रोजी सकाळी सुमारे साडेनऊ वाजेच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.अशी माहिती कुटुंबीयांनी दिली. काही दिवसांपूर्वी प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; उपचार सुरू असतानाच नियतीने त्यांना कुटुंबीय आणि कोट्यवधी चाहत्यांकडून हिरावून घेतले.
आगामी ८ डिसेंबरला त्यांचा ९०वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा होणार असतानाच काही दिवस आधीच त्यांचा कायमचा निरोप मिळाल्याने संपूर्ण चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. निधनाची वार्ता समजताच देओल कुटुंबीयांनी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास पार्थिव विलेपार्ले स्मशानभूमीत अंत्यदर्शनासाठी आणले. अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, आमिर खान यांसह अनेक दिग्गजांनी उपस्थित राहून या अजरामर कलाकाराला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
सहा दशकांहून अधिक काळ हिंदी सिनेमावर विलक्षण अभिनयकौशल्याने अधिराज्य गाजवणाऱ्या धर्मेंद्र यांनी १९६० मध्ये ‘दिल भी तेरा हम भी तेरे’मधून रूपेरी पडद्यावर पाऊल ठेवले. पुढे ‘फूल और पत्थर’, ‘मेरा गाव मेरा देश’, ‘यादों की बारात’, ‘शोले’, ‘नौकर बीवी का’, ‘पत्थर’, ‘घायल’ अशा एकापेक्षा एक गाजलेल्या चित्रपटांनी त्यांची लोकप्रियता अभूतपूर्व उंचीवर नेली. दमदार व्यक्तिमत्त्व, ऍक्शन, रोमँस आणि भावनिक भूमिका सहजतेने साकारण्याची क्षमता ही त्यांची खरी ओळख. त्यामुळेच प्रेक्षकांनी त्यांना ‘ही-मॅन’ ही उपाधी बहाल केली.
२०१२ मध्ये देशाने त्यांच्या योगदानाचा गौरव करत त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले. त्यांच्या कारकिर्दीतील शेवटचा चित्रपट ‘इक्किस’ २५ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार असून आता तोच त्यांचा अखेरचा पडदा ठरणार आहे, ही चाहत्यांसाठी कडवट वेदना देणारी बाब ठरली आहे.
धर्मेंद्र यांचा जीवन प्रवास
१९३५ मध्ये पंजाबमधील नारसळी गावात जन्मलेले धर्मेंद्र (पूर्ण नाव – धर्मेंद्र के. कृष्ण देओल) साधेपणातून उभे राहून आकाशाला भिडलेल्या कीर्तीपर्यंत मजल मारणारे कलाकार होते. जवळपास ३०० हून अधिक चित्रपटांमध्ये अभिनय करत त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात अमिट ठसा उमटवला. अभिनयाबरोबरच त्यांनी समाजकारणातही पाऊल ठेवत २००४ ते २००९ या काळात लोकसभेचे सदस्य म्हणून कार्यभार सांभाळला.
धर्मेंद्र यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीने केवळ एक महान अभिनेता गमावलेला नाही, तर संपूर्ण देशाने आपल्या संस्कृतीत रुजलेला, पिढ्यान्पिढ्यांचा आवडता असा अजरामर कलाकार हरवला आहे. त्यांच्या कामगिरीची, व्यक्तिमत्त्वाची आणि कर्तृत्वाची परंपरा सदैव जिवंत राहील.
