Monday, November 2, 2026
HomeBlogभोकरच्या स्टेट बँकेत सशस्त्र दरोडा; बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक पुन्हा संशयाच्या भोवऱ्यात

भोकरच्या स्टेट बँकेत सशस्त्र दरोडा; बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक पुन्हा संशयाच्या भोवऱ्यात

भोकरच्या स्टेट बँकेत सशस्त्र दरोडा; बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक पुन्हा संशयाच्या भोवऱ्यात

ग्रामस्थांनी ट्रॅक्टर आडवा लावून दरोडेखोरांना रोखले; काही तासांत चौघे जेरबंद

जळगाव, प्रतिनिधी : तालुक्यातील भोकर येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत शनिवारी (दि. ३१ ऑक्टोबर) दुपारी सशस्त्र दरोडा टाकून सोने आणि सुमारे १५ लाख रुपयांची रोकड लुटण्यात आली. हेल्मेट व मास्क घालून आलेल्या चार दरोडेखोरांनी एअरगनचा धाक दाखवत बँकेतील १६ लॉकर उघडले आणि सोने व रोकड सहा बॅगांमध्ये भरून दोन दुचाकींवरून पलायन केले. मात्र, ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखत पाठलाग केला. डिकसाईजवळ रस्त्यावर ट्रॅक्टर आडवा लावून दरोडेखोरांना रोखण्यात आले. पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने चौघांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून लुटीतील ऐवज जप्त करण्यात आला आहे.

बँकेत सात जणांना कोंडले

दरोडेखोरांनी बँकेत प्रवेश करताच अधिकारी व कर्मचाऱ्यांना एअरगनचा धाक दाखवून धमकावले. त्यावेळी बँकेत सहा अधिकारी-कर्मचारी आणि एक सुरक्षा रक्षक असे सात जण उपस्थित होते. दरोडेखोरांनी व्यवस्थापक आणि कॅशियर यांना लॉकरच्या चाव्या घेऊन लॉकरकडे जाण्यास भाग पाडले. सुरक्षा रक्षकाने विरोध करण्याचा प्रयत्न केला असता, एका दरोडेखोराने त्याच्या पायाजवळ हवेत गोळी झाडली. त्यानंतर बंदुकीचा धाक दाखवून लॉकर उघडण्यास भाग पाडण्यात आले. सोने आणि रोकड बॅगांमध्ये भरल्यानंतर दरोडेखोरांनी बँकेतील कर्मचाऱ्यांच्या तोंडाला चिकटपट्टी लावून त्यांना एका खोलीत कोंडले आणि पलायन केले.

चादर विक्रीच्या बहाण्याने रेकी

दरोडा टाकण्यापूर्वी चौघांपैकी एका संशयिताने चादर विक्रीच्या बहाण्याने भोकर गावात फिरून रेकी केल्याची माहिती समोर आली आहे. गावातील रस्ते आणि परिसराची माहिती घेतल्यानंतर शनिवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास दरोड्याची योजना अंमलात आणण्यात आली. दोन दुचाकींवरून आलेल्या चौघांनी बँकेत प्रवेश करून काही वेळातच कोट्यवधींचा ऐवज लुटला.

ग्रामस्थांनी पाठलाग करून दरोडेखोरांना पकडले

दरोडेखोर पसार झाल्याचे लक्षात येताच ग्रामस्थांनी बँकेकडे धाव घेत कर्मचाऱ्यांची सुटका केली आणि तालुका पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर ग्रामस्थांनी दुचाकींवरून दरोडेखोरांचा पाठलाग सुरू केला. किनोदजवळ त्यांना रोखण्याचा प्रयत्न झाला; मात्र दरोडेखोर निसटले. रिघूरजवळही त्यांना अडविण्याचा प्रयत्न करण्यात आला. अखेर डिकसाईजवळ रस्त्यावर ट्रॅक्टर आडवा लावल्याने एका दरोडेखोराला शेतात पळावे लागले. तेथे ग्रामस्थांनी त्याला पकडले. दरम्यान, पोलिसांनी जिल्हाभरातील यंत्रणेला सतर्क केले होते.

बडतर्फ उपनिरीक्षक शंकर जासक मुख्य सूत्रधार असल्याचा संशय

या दरोड्याचा मुख्य सूत्रधार बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक शंकर जासक असल्याचा पोलिसांना संशय आहे. मुंबई येथे कार्यरत असताना त्याच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली होती. आर्थिक विवंचनेतून त्याने २०२३ मध्ये आपल्या मेहुण्याच्या मदतीने जळगाव शहरातील शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या स्टेट बँकेत दरोडा टाकून ३ कोटी १७ लाख रुपयांचा ऐवज लुटल्याचा आरोप आहे. या गुन्ह्यात तो जिल्हा कारागृहात होता. जामिनावर बाहेर आल्यानंतर त्याने पुन्हा स्टेट बँकेला लक्ष्य केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

पोलिसांची घटनास्थळी धाव

घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड आणि तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक शशिकांत पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी बँकेत जाऊन घटनेची माहिती घेतली.

पाठलाग सुरू होताच बॅगा फेकल्या

पोलिसांचा पाठलाग सुरू असल्याचे लक्षात येताच एका दुचाकीवरील दरोडेखोरांनी चावलखेड्याच्या दिशेने पळ काढताना सोने व रोकड असलेल्या बॅगा रस्त्यावर फेकून दिल्याची माहिती आहे. पोलिसांनी लुटीतील ऐवज हस्तगत केला असून, सुमारे १५ लाख रुपयांची रोकड आणि सोन्याच्या बॅगा जप्त केल्याचे सांगण्यात आले. दुपारी अडीचच्या सुमारास सुरू झालेला हा दरोडा अवघ्या अर्ध्या ते पाऊण तासात उघडकीस आला. ग्रामस्थांचे प्रसंगावधान आणि पोलिसांची तत्परता यामुळे दरोडेखोरांचा डाव उधळला गेला.

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या