उत्तर महाराष्ट्रावर ढगांची चादर; पावसाबाबत काय म्हणतायेत हवामान अभ्यासक?
जळगाव, धुळे, नंदुरबारमध्ये ढगाळ वातावरण कायम; तुरळक सरींची शक्यता
जळगाव : उत्तर महाराष्ट्रात मंगळवारी सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने पावसाबाबत चर्चा रंगू लागली आहे. जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात आकाशात ढगांची दाटी दिसून येत असली, तरी सध्या मोठ्या किंवा व्यापक पावसाची शक्यता कमी असल्याची माहिती हवामान अभ्यासक निलेश गोरे यांनी दिली आहे.
अरबी समुद्रातील आर्द्रतेचा परिणाम
अरबी समुद्रात वाढलेली आर्द्रता आणि सक्रिय झालेल्या दक्षिण-पश्चिम वाऱ्यांमुळे मुंबई, कोकण आणि केरळ किनारपट्टी भागात मोठ्या प्रमाणावर ढगांची निर्मिती होत आहे. त्याचाच परिणाम उत्तर महाराष्ट्रात ढगाळ वातावरणाच्या स्वरूपात जाणवत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हलक्या सरींची शक्यता
सध्या ही हवामान प्रणाली मुख्यतः किनारपट्टी भागात सक्रिय असल्याने जळगाव, धुळे आणि नंदुरबारमध्ये सतत पाऊस अपेक्षित नाही. मात्र काही भागांत दुपारनंतर हलक्या सरी किंवा विजांच्या कडकडाटासह तुरळक पाऊस होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
उष्णता कमी, पण दमट वातावरण कायम
ढगाळ वातावरणामुळे उन्हाचा तडाखा काहीसा कमी झाला असला, तरी हवेत उष्णता आणि आर्द्रता कायम राहणार आहे. मान्सूनचा थेट प्रभाव उत्तर महाराष्ट्रात पोहोचण्यासाठी अजून काही दिवस प्रतीक्षा करावी लागेल, असेही निलेश गोरे यांनी सांगितले.
“सध्या उत्तर महाराष्ट्रात दिसणारे ढग हे किनारपट्टीवरील हवामान प्रणालीचा परिणाम आहेत. तुरळक सरी संभवतात, मात्र मोठ्या पावसाची शक्यता सध्या कमी आहे.”
– निलेश गोरे, हवामान अभ्यासक / जळगाव वेदर
