Wednesday, December 10, 2025
Homeक्राईमभुसावळमध्ये दरोड्याचा मोठा कट उधळला

भुसावळमध्ये दरोड्याचा मोठा कट उधळला

भुसावळमध्ये दरोड्याचा मोठा कट उधळला
विशेष गस्ती दरम्यान आंतरराज्य दरोडेखोर टोळीचा पर्दाफाश; तीन जेरबंद, पाच फरार

भुसावळ : शहर नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाढवलेल्या विशेष गस्तीचा मोठा परिणाम बुधवारी उशिरा पाहायला मिळाला. भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी दरोड्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळताच तातडीने कारवाई करत मध्य प्रदेशातील हरदा जिल्ह्यातील आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश केला. रात्री सुमारे ११.१० वाजता काळा हनुमान मंदिरासमोरील भाजी मार्केटजवळील आदर्श पॅकेजिंग दुकानाच्या मागे तीन संशयित हालचाल करताना दिसताच पथकाने वेगाने धाड टाकली. छाप्यात तीन जणांना पकडण्यात यश आले, तर पाच साथीदार अंधाराचा फायदा घेत पसार झाले.

पोलिसांच्या ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये शुभम दुर्गाप्रसाद ओनकर (२४, पोखरणी, ता. खिडकिया), मृत्युंजय उर्फ भोला संत्येंद्र कवीशेखर (४३, बंगाली कॉलनी, हरदा) आणि राजू उर्फ शिवकुमार माणिक (१९, मंगल बाजार, खिडकिया) यांचा समावेश आहे. पोलिसांना पाहताच तिघांनी पळण्याचा प्रयत्न केला पण पथकाने पाठलाग करून त्यांना पकडले.

या टोळींकडून गावठी पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे, १२ इंची चॉपर, मिरची स्प्रे, २० फूट दोरी, तसेच तीन बिना नंबर मोटारसायकली — काळ्या व राखाडी रंगातील दोन बजाज पल्सर आणि लाल रंगाची अपाची — अशी सुमारे दीड लाख रुपये किंमतीची साधनसामग्री जप्त करण्यात आली. दोन मोबाईल फोनही पोलिसांनी कब्जात घेतले.

चौकशीत आरोपींनी कबुली दिली की भुसावळमधील बंटी परशुराम पथरोड, शिव पथरोड, अभिषेक जवाहरलाल गौर आणि तेजस चंद्रकांत टकले यांनी सराफ बाजार परिसरातील दुकाने आणि श्रीमंत नागरिकांच्या बंगल्यांवर दरोडा टाकण्यासाठी त्यांना बोलावले होते. स्थानिक साथीदारांनी ‘टार्गेट’ही दाखवले असून बुधवारी रात्रीच कारवाईची योग्य वेळ असल्याची माहिती दिली होती.

फरार झालेल्यांमध्ये मयूर टाक, आशिष चोटी, विरेंद्र कडोले उर्फ भय्यू येडा, हनी ठाकुर आणि एक अज्ञात साथीदाराचा समावेश आहे. पोलीस हेडकॉन्स्टेबल विजय नेरकर यांच्या फिर्यादीवरून भुसावळ बाजारपेठ पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला असून या सर्वांचा कसून शोध सुरू आहे.

ही संपूर्ण कारवाई पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मंगेश जाधव आणि त्यांच्या पथकाने केली.

ताज्या बातम्या