जळगाव बाजार समितीच्या सभापतीपदी ‘लकी टेलर’ बिनविरोध; अंतर्गत नाट्यानंतर लक्ष्मण पाटील अखेर खरेच ‘लकी’ ठरले!
जळगाव (दिव्य भरारी प्रतिनिधी): जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदाच्या राजकीय नाट्याला अखेर आज सोमवार, १८ मे रोजी पूर्णविराम मिळाला आहे. बाजार समितीच्या सभापतीपदी लक्ष्मण गंगाराम पाटील उर्फ ‘लकी टेलर’ यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या पदासाठी केवळ लकी टेलर यांचाच एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांची बिनविरोध निवड घोषित केली. तत्पूर्वी, विद्यमान सभापती सुनील महाजन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे या निवडीचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला होता.
गेल्या काही दिवसांपासून जळगाव बाजार समितीच्या सभापतीपदावरून महायुतीमध्ये मोठे अंतर्गत राजकारण रंगले होते. महायुतीकडे स्पष्ट बहुमत असतानाही अंतर्गत कुरघोडीमुळे राजकीय उत्सुकता ताणली गेली होती. यापूर्वी शामकांत सोनवणे यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणून सुनील महाजन यांना सभापती करण्यात आले होते. मात्र, अवघ्या ६ ते ७ महिन्यांतच संचालकांनी महाजन यांच्या विरोधातही अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. या घडामोडींनंतर मंत्री गिरीश महाजन, आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडे धाव घेतली होती. दोन्ही नेत्यांनी संचालकांसोबत मॅरेथॉन बैठक घेतली, मात्र तोपर्यंत नवीन चेहऱ्याचे नाव गुलदस्त्यात ठेवण्यात आले होते.
सभापतीपदाच्या शर्यतीत मनोज दयाराम चौधरी, लकी टेलर आणि मिलिंद चौधरी यांच्या नावांची जोरदार चर्चा सुरू होती. अखेर पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी लक्ष्मण गंगाराम पाटील उर्फ लकी टेलर यांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब केले. यापूर्वी दोन वेळा अत्यंत जवळ येऊनही सभापतीपदाने हुलकावणी दिली होती, मात्र तिसऱ्या प्रयत्नात थेट बिनविरोध निवड झाल्याने “लकी टेलर अखेर खरेच लकी ठरले,” अशी चर्चा जळगावच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.
या ऐतिहासिक निवडीच्या प्रसंगी आमदार राजूमामा भोळे, आमदार मंगेश चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्यासह बाजार समितीचे सर्व संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवड जाहीर होताच नूतन सभापती लक्ष्मण पाटील यांचा भव्य सत्कार करण्यात आला. दरम्यान, प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार मंगेश चव्हाण यांनी, बाजार समितीच्या उर्वरित तीन वर्षांच्या कार्यकाळात तीन सभापती आणि तीन उपसभापती होणार असल्याचे सूतोवाच करत, आगामी काळातील नवीन राजकीय समीकरणांचे संकेत दिले आहेत.
ताज्या राजकीय घडामोडींसाठी पाहत रहा: दिव्य भरारी