कै. इंदिराबाई पाटणकर मराठी शाळेत पहिल्यांदाच ‘बाल आनंद मेळावा’ उत्साहात
विद्यार्थ्यांच्या सहभागातून शैक्षणिक-व्यावहारिक उपक्रमांना चालना
जळगाव (प्रतिनिधी) : शिवाजीनगर येथील कै. इंदिराबाई पाटणकर नवीन मराठी शाळेमध्ये पहिल्यांदाच ‘बाल आनंद मेळावा’चे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा मेळावा अत्यंत आनंदी, रंगतदार व उत्साहवर्धक वातावरणात पार पडला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास, संघभावना आणि व्यावहारिक ज्ञानाला चालना मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
या बाल आनंद मेळाव्यात इयत्ता दुसरी ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थांचे आकर्षक स्टॉल उभारले होते. विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेले व सजवलेले हे स्टॉल पाहण्यासाठी पालकांसह नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. लहानग्यांनी विक्री, व्यवहार व संवाद कौशल्यांचा अनुभव घेतला.
या मेळाव्याचे उद्घाटन मनपा शिक्षण मंडळ, जळगाव येथील प्रशासन अधिकारी खलील साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मनपा केंद्र शाळा क्रमांक १ चे केंद्रप्रमुख समाधान सोनवणे सर, फोनेटिक इन्स्टिट्यूटच्या संचालिका माननीय चांडक मॅडम, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष व सर्व सदस्य, पालक प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उद्घाटनप्रसंगी मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे व उपक्रमशीलतेचे कौतुक करत अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो, असे मत व्यक्त केले. शाळा प्रशासनाच्या या अभिनव उपक्रमाबद्दल पालकांनीही समाधान व्यक्त केले.
बाल आनंद मेळाव्याच्या यशस्वी आयोजनामुळे शाळेच्या शैक्षणिक उपक्रमांना नवी ओळख मिळाली असून, भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे, अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली.
