जळगाव शहरात अजितदादा पवार यांचा पूर्णाकृती पुतळा उभारणार
सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेत चाहत्यांची भावना; पालकमंत्र्यांचे नियोजन बैठकीत विषय मांडण्याचे आश्वासन
जळगाव : जळगाव शहरात राज्याचे उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा, अशी अपेक्षा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांनी व्यक्त केली. येथील छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृहात आयोजित सर्वपक्षीय-सर्वस्तरीय श्रद्धांजली अर्पण सभेत त्यांनी ही भावना मांडली. या मागणीला तात्काळ सकारात्मक प्रतिसाद देत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्या होणाऱ्या जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत पुतळ्याचा विषय मांडण्यात येईल, असे स्पष्ट केले.
यावेळी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनीही लोकप्रतिनिधींच्या मागणीवर प्रशासन सकारात्मक असून योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले.
दरम्यान, माजी उपमहापौर करीम सालार यांनी अजितदादा पवार यांच्या पुतळ्यासोबतच त्यांच्या कार्याचा, निर्णयांचा व राज्याच्या विकासातील योगदानाचा परिचय करून देणारे स्वतंत्र संग्रहालय (म्युझियम) उभारण्यात यावे, अशी मागणी केली. यामुळे भावी पिढीला त्यांच्या कार्यातून प्रेरणा मिळेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
सोमवार 1 फेब्रुवारी रोजी छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृहात आयोजित या श्रद्धांजली सभेत विविध राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी अजित पवार यांच्या कार्यपद्धती, नेतृत्वगुण, निर्णयक्षमता आणि राज्याच्या सर्वांगीण विकासातील योगदानावर प्रकाश टाकला.
यावेळी माजी खासदार ईश्वरलाल जैन, आमदार अनिल पाटील, आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार राजूमामा भोळे, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार, शिवसेना (शिंदे गट) जिल्हाध्यक्ष विष्णू भंगाळे, मनसेचे जमील देशपांडे, भाजप जिल्हाध्यक्ष राधेश्याम चौधरी, अॅड. रवींद्र पाटील, डॉ. उल्हास पाटील, करीम सालार, मुकुंद सपकाळे, क्रिडाई राज्य उपाध्यक्ष अनीश शहा, राष्ट्रवादी (श.प.)चे प्रमोद पाटील, जळकेकर महाराज, लोक संघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे, अभियंता व्ही.डी. पाटील, प्रा. उत्तम सुरवाडे, पत्रकार संघाचे प्रवीण सपकाळे, नगरसेवक अरविंद देशमुख, व्यापारी महामंडळाचे युसूफ मकरा, वकील संघाचे अॅड. सागर चित्रे, राष्ट्रवादी (श.प.)च्या रोहिणी खडसे, प्राचार्य कुलगुरू इंगळे, महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, उद्योजक श्रीराम पाटील, राजेश दत्तू पाटील, रोहित दिलीपराव निकम, घनश्याम ओंकारदास अग्रवाल, विजय मोतीराम चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. उल्हास पाटील यांनी सांगितले की, अजित पवार यांनी नेहमीच गोरगरीबांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य दिले. नव्या पिढीतील कार्यकर्ते घडविण्याचे मोठे काम त्यांनी केले असून राज्याच्या विकासातील त्यांचे योगदान अमूल्य आहे. व्ही.डी. पाटील यांनी सिंचन क्षेत्रातील त्यांच्या भरीव कार्याचा उल्लेख केला, तर आमदार राजूमामा भोळे यांनी राज्याने एक कर्तव्यदक्ष व काम करणारा नेता गमावल्याची भावना व्यक्त केली. आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी क्रीडा व सिंचन प्रकल्पांसाठी अजित पवार यांनी दिलेल्या सहकार्याची आठवण करून दिली.
माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी मंत्रीपदाच्या काळात अजित पवार कामाचा व दौऱ्यांचा सातत्याने आढावा घेत असत, असे सांगितले. माजी खासदार ईश्वरलाल जैन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दीर्घकाळ एकत्र काम करताना अजित पवार यांची निर्णयक्षमता व कणखरपणा अनुभवास आल्याचे भावनिक शब्दांत सांगितले.
श्रद्धांजली अर्पणावेळी वातावरण भावनिक झाले. जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार व्यासपीठावर येताच गहिवरले. अजितदादांसोबतच्या आठवणी सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले. अजितदादा हे केवळ नेता नव्हते, तर मार्गदर्शक व आधारस्तंभ होते, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, अमळनेर तालुक्यातील तापी नदीवरील पाडळसरे निम्म तापी प्रकल्पाला स्व. अजित पवार यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी आमदार अनिल पाटील यांनी केली. सिंचन क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची दखल म्हणून जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन याबाबत कॅबिनेट ठराव करावा, अशी भूमिका मांडण्यात आली. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी या मागणीसाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
