Thursday, February 5, 2026
Homeखानदेशझुडपांनी वेढलेल्या विहिरीतून कारसह दाम्पत्याचे मृतदेह आढळले !

झुडपांनी वेढलेल्या विहिरीतून कारसह दाम्पत्याचे मृतदेह आढळले !

झुडपांनी वेढलेल्या विहिरीतून कारसह दाम्पत्याचे मृतदेह आढळले !

वडनेर भोलजी उड्डाणपुलाजवळील घटना ;तीन दिवसांच्या शोधानंतर उलगडा

मलकापूर (प्रतिनिधी) : तेलंगणातून जळगाव–खान्देशातील लग्न समारंभासाठी निघालेल्या दाम्पत्याचा अखेर तीन दिवसांनंतर शोध लागला. राष्ट्रीय महामार्ग क्र. ५३ वर वडनेर भोलजी उड्डाणपुलाजवळील झुडपांनी आच्छादलेल्या एका विहिरीत त्यांची कार आढळून आली. २९ नोव्हेंबर रोजी दुपारी सुमारास २.२० वाजता पती–पत्नीचे मृतदेह कारमध्येच सापडल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली.

तेलंगणातील सीतापूरम येथील सिमेंट कंपनीत कार्यरत पद्मसिंह दामू पाटील (४९) आणि त्यांची पत्नी नम्रता (४५) हे एमएच १३ बीएन ८४८३ या क्रमांकाच्या कारने डोकलखेडा येथील लग्नसमारंभासाठी २७ नोव्हेंबर रोजी निघाले होते. सायंकाळी ६.३० वाजता त्यांचा नातलगांशी शेवटचा संपर्क झाला. त्यानंतर दोघांचेही फोन बंद येऊ लागल्याने नातेवाईकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले.

टोलनाक्याचे रेकॉर्ड आणि लोकेशन

पोलिस तपासात दाम्पत्याने २७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.३१ वाजता बाळापूर टोलनाका पार केल्याची माहिती मिळाली. मोबाइलचे शेवटचे लोकेशन वडनेर भोलजी परिसरात आढळले. त्यामुळे नांदुरा पोलिस ठाण्यात बेपत्ता तक्रार दाखल करण्यात आली. सोशल मीडियावर माहिती व्हायरल होताच तपास अधिक गतीमान झाला; मात्र २८ नोव्हेंबरपर्यंत ठोस धागा लागला नव्हता.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार महामार्गालगतच्या सर्व विहिरी, नाले आणि झाडाझुडपांची तपासणी सुरू करण्यात आली. पोलिस निरीक्षक गणेश गिरी यांच्या आदेशानुसार सहायक पोलीस निरीक्षक गजानन कौळासे यांनी पथकासह शोधमोहीम वाढवली. मलकापूर–वडनेरदरम्यान तपासलेल्या चौथ्या विहिरीनंतर पाचव्या विहिरीत अखेर दाम्पत्याची कार दिसली आणि संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला.

शनिवारी सकाळी जिल्हा पोलिस अधीक्षक नीलेश तांबे यांनी नांदुरा पोलिस ठाण्यात भेट देऊन तपासाचा आढावा घेतला. दुपारी कार आढळताच वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. क्रेनच्या साहाय्याने कार बाहेर काढण्याचे काम सुरू झाले. ओम साई फाउंडेशनचे रेस्क्यू कार्यकर्ते, नांदुरा फायर ब्रिगेड आणि पोलीस दलाच्या मदतीने सायंकाळपर्यंत दोन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आले.

मृताचे नातेवाईक संदीप रमेश पाटील यांनी महामार्ग प्राधिकरणाच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप करून संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

 

ताज्या बातम्या