Wednesday, November 4, 2026
Homeखानदेशरस्त्यावरील अतिक्रमण काढण्यासह गटारी मोकळ्या करण्याचे निर्देश

रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यासह गटारी मोकळ्या करण्याचे निर्देश

रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यासह गटारी मोकळ्या करण्याचे निर्देश

वार्ड क्र. ८ मध्ये महापौर दीपमाला काळे यांचा अभियानांतर्गत पाहणी दौरा

जळगाव (प्रतिनिधी): महापौर स्वच्छता संकल्प अभियान अंतर्गत महापौर दीपमाला काळे यांनी शनिवारी (दि. २४) वार्ड क्रमांक ८ येथे प्रत्यक्ष पाहणी दौरा करत स्वच्छता, आरोग्य, शिक्षण आणि अतिक्रमण व्यवस्थापनाचा आढावा घेतला.

या वेळी स्थानिक नगरसेवक नरेंद्र आत्माराम पाटील, कविता सागर पाटील यांच्यासह बांधकाम विभागाचे अभियंता मनोज वनेरे, स्वच्छता निरीक्षक रमेश कांबळे, महेश ठाकूर आणि पाणीपुरवठा, विद्युत व आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते. दौऱ्यादरम्यान स्वच्छता निरीक्षक महेश ठाकूर यांनी व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून स्वच्छतेच्या कामांचे नगरसेवकांच्या समन्वयाद्वारे अचूक अपडेशन ठेवल्याचे निदर्शनास आल्याने महापौरांनी त्यांच्या कार्यप्रणालीचे कौतुक केले.

मात्र, छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात रस्त्याच्या मधोमध आणि रस्त्यावर आलेल्या भाजी विक्रेत्यांमुळे वाहतुकीला मोठ्या प्रमाणावर अडथळा निर्माण होत असल्याचे पाहून महापौरांनी तातडीने हे अतिक्रमण हटवण्याचे आणि विक्रेत्यांनी रस्त्यावर न बसता बाजूला व्यवसाय करण्याचे सक्त निर्देश दिले.

वार्डात पाहणी करताना काही गटारींवर पक्के ढापे असल्याने साफसफाईत अडथळा येत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यावर तातडीने ढापे तोडून जाळी बसवण्याचे आदेश त्यांनी दिले. तसेच, महापालिकेच्या नंदराम बिर्ला शाळेला भेट देऊन शिक्षकांशी संवाद साधला आणि शाळेच्या दोन्ही बाजूंच्या तुटलेल्या भिंतींची त्वरित दुरुस्ती करण्याचे आदेश बांधकाम विभागाला दिले. मोकळ्या प्लॉटवरील कचरा साफ करण्याबरोबरच, झाडेझुडपे काढण्याची निर्देश महापौरांनी दिले. तसेच काही प्लॉट धारक साफसफाई करण्यास अडथळा करीत असल्याने या प्लॉटधारकांना नोटीसा बजावून कारवाई करण्याचे आणि सहकार्य न करणाऱ्यांना दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले.

शनि मंदिराजवळील मोठ्या रिकाम्या जागेत पसरलेल्या अस्वच्छतेबाबत प्लॉटधारकांवर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. स्वस्त धान्य दुकानाजवळ पडलेला उघडा कचरा तात्काळ उचलण्यास सांगण्यात आले, तर पिंप्राळा गावठाण भागातील पडक्या घरांना नोटीसा देऊन यापूर्वी नोटीस दिलेल्या धोकादायक वास्तू तातडीने काढून टाकण्यास सांगण्यात आले. दरम्यान, रथ चौकामध्ये पाणी गळती होत असल्याचे निदर्शनास आल्यावर महापौरांनी संबंधित पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांना जाब विचारून तात्काळ दुरुस्ती करण्याचे आदेश दिले. सोमवारी महापौर स्वच्छता संकल्प अभियान मध्ये वार्ड क्रमांक ९ येथे भेट दिली जाणार आहे.

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या