Thursday, August 20, 2026
Homeजळगाव जिल्हाअशोक सराफ यांनी मराठी सिनेमाला वेगळी उंची दिली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अशोक सराफ यांनी मराठी सिनेमाला वेगळी उंची दिली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अशोक सराफ यांनी मराठी सिनेमाला वेगळी उंची दिली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर येथे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा नागरी सत्कार; ५ लाख रुपयांचा धनादेश प्रदान

नागपूर, दि. २० | प्रतिनिधी

मराठी माणसाच्या जीवनातील संघर्ष, वास्तव, मर्यादा, दुःख आणि आनंद आपल्या कलाकृतींमधून प्रभावीपणे मांडत ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी मराठी सिनेमाला खऱ्या अर्थाने लोकाभिमुख केले. त्यांच्या अभिनयामुळे मराठी चित्रपटसृष्टीला वेगळी उंची प्राप्त झाली, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.

महाराष्ट्र भूषण व पद्मश्री अशोक सराफ यांच्या नागरी सत्कार सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. नागपूर महानगरपालिका, विदर्भ गौरव प्रतिष्ठान आणि श्री सिद्धीविनायक ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने वसंतराव देशपांडे सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

अनेक पिढ्यांना दिला आनंद

अशोक सराफ यांच्यासारखे कलाकार लाभणे ही मराठी रंगभूमी, चित्रपटसृष्टी आणि रसिकांसाठी अभिमानाची बाब आहे. त्यांच्या कलेचे कौतुक आणि योगदानाचा गौरव करण्यासाठी आयोजित करण्यात आलेला हा नागरी सत्कार नागपूरकरांच्या कृतज्ञतेची भावना व्यक्त करणारा क्षण आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

अशोक सराफ यांच्या कलाकृतींनी अनेक पिढ्यांना आनंद दिला असून, त्यांनी आपल्या सर्वांना मराठी सिनेमाची गोडी लावली. रसिकांच्या मनात त्यांनी निर्माण केलेल्या आनंदाचा हा सत्कार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

‘प्रेक्षक आहेत म्हणून आम्ही आहोत’

सत्काराला उत्तर देताना अशोक सराफ यांनी भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली. “आजवर माझा इतका भव्य सत्कार झालेला नाही. प्रेक्षक आहेत म्हणून आम्ही आहोत,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी अभिनेते पुष्कर श्रोत्री यांनी अशोक सराफ यांची प्रकट मुलाखत घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि ५ लाख रुपयांचा धनादेश देऊन अशोक सराफ यांचा गौरव करण्यात आला.

विदर्भ गौरव प्रतिष्ठानतर्फे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी यांनी सन्मानचिन्ह आणि ५१ हजार रुपयांचा धनादेश दिला. श्री सिद्धीविनायक ट्रस्टतर्फेही १ लाख रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला.

अशोक सराफ यांनी वयाची ८० वर्षे पूर्ण करून ८१व्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल यावेळी ८० दिव्यांनी औक्षण करण्यात आले.

कार्यक्रमाला महापौर नीता ठाकरे, डॉ. गिरीश गांधी, श्री सिद्धीविनायक सेवा ट्रस्टचे अध्यक्ष व माजी आमदार संदीप जोशी, उपमहापौर लीला हाथीबेड, स्थायी समिती अध्यक्ष शिवानी दाणी-वखरे, सत्ता पक्षनेते नरेंद्र बोरकर आणि मनपा आयुक्त डॉ. विपीन इटनकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक संदीप जोशी यांनी केले, तर सूत्रसंचालन पुष्कर श्रोत्री यांनी केले.

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या