Saturday, August 15, 2026
Homeक्राईमगणेशोत्सवापूर्वी जळगाव पोलिसांचा ‘एमपीडीए’चा दणका!

गणेशोत्सवापूर्वी जळगाव पोलिसांचा ‘एमपीडीए’चा दणका!

गणेशोत्सवापूर्वी जळगाव पोलिसांचा ‘एमपीडीए’चा दणका!

सराईत गुन्हेगार तन्वीर ऊर्फ तन्याची येरवडा कारागृहात रवानगी; ११ गंभीर गुन्ह्यांची नोंद

जळगाव | प्रतिनिधी — आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जळगाव पोलिसांनी सराईत गुन्हेगारांविरोधातील प्रतिबंधात्मक कारवाईला वेग दिला आहे. याच मोहिमेअंतर्गत जळगाव शहर पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तन्वीर ऊर्फ तन्या रहीम शेख (वय २१, रा. नुरानी मशीदजवळ, गेंदालाल मिल, जळगाव) याच्यावर महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले, औषधद्रव्ये विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती व इतर समाजविघातक व्यक्ती यांच्या प्रतिबंधक कायद्यानुसार (एमपीडीए) स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. त्याची येरवडा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली.

तन्वीर शेख याच्याविरुद्ध जळगाव शहर पोलीस ठाण्यात जबरी चोरी, सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला, दुखापत, दंगा, घरफोडी तसेच आर्म्स ॲक्ट यांसारख्या गंभीर स्वरूपाचे एकूण ११ गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. २०२२ ते २०२६ या कालावधीत त्याच्यावर विविध प्रतिबंधात्मक कारवाया तसेच हद्दपारीची कारवाई करण्यात आली होती. मात्र, त्याच्या वर्तनात अपेक्षित सुधारणा न झाल्याने पोलिसांनी त्याच्याविरुद्ध एमपीडीएअंतर्गत कठोर कारवाईचा प्रस्ताव तयार केला.

जळगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांनी ११ ऑगस्ट २०२६ रोजी स्थानबद्धतेचा प्रस्ताव सादर केला. प्रस्तावाची दखल घेत जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी १४ ऑगस्ट रोजी एमपीडीएअंतर्गत स्थानबद्धतेचा आदेश जारी केला. आदेशानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत तन्वीर शेख याला ताब्यात घेतले आणि येरवडा मध्यवर्ती कारागृहात दाखल केले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, पोलीस निरीक्षक सागर शिंपी, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड तसेच त्यांच्या पथकाने कारवाईत सहभाग घेतला.

गणेशोत्सवासह आगामी सण-उत्सवांच्या काळात शांतता भंग करण्याची शक्यता असलेल्या सराईत गुन्हेगारांवर पोलिसांची करडी नजर असून, समाजकंटकांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई आणखी तीव्र केली जाणार असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या