मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमास वेग;जळगाव जिल्ह्यात ९८.९९ टक्के कामकाज पूर्ण जिल्हाधिकारी
जळगाव, : ‘विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम २०२६’ अंतर्गत जळगाव जिल्ह्यात मतदार याद्यांच्या पुनरीक्षणाचे काम वेगाने सुरू असून, आज दि. १२ ऑगस्ट २०२६ रोजी जिल्ह्यातील ९८.९९ टक्के कामकाज पूर्ण झाले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात दिली.
जिल्ह्यात एकूण ३५ लाख ५२ हजार १९९ मतदार असून त्यापैकी अनुपस्थित, स्थलांतरित, मयत व दुबार मतदारांच्या (Absent, Shifted, Dead and Duplicate – ASDD) मतदारसंघनिहाय याद्या जळगाव जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर www.jalgaon.nic.in येथे प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या याद्यांमध्ये जिल्ह्यातील सुमारे ४ लाख ८७ हजार ३८९ मतदारांची नावे आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रोहन घुगे यांनी जिल्ह्यातील मतदारांना आवाहन केले आहे की, मतदारांनी ASDD याद्यांचे अवलोकन करावे. आपले नाव ASDD यादीत असल्यास संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) किंवा मतदार नोंदणी अधिकारी (ERO) कार्यालयाशी संपर्क साधून EF फॉर्म भरण्याची कार्यवाही करावी. तसेच आपले नाव मतदार यादीत अबाधित राहील, याची दक्षता घ्यावी.
दरम्यान, १७ ऑगस्टपर्यंत पुनरीक्षण प्रक्रिया पूर्ण करून २४ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. जिल्ह्यात सध्या ३ हजार ६७७ मतदान केंद्रे असून, निवडणूक आयोगाने एका मतदान केंद्रासाठीची मतदारसंख्या १ हजार ५०० वरून १ हजार २०० केली आहे. त्यानुसार सुसूत्रीकरणासाठी जिल्ह्यात ३२ नवीन मतदान केंद्रे निर्माण करण्याचा प्रस्ताव आयोगाकडे पाठविण्यात आला आहे. मंजुरीनंतर ही नवीन मतदान केंद्रे कार्यान्वित करण्यात येणार आहेत.
