Thursday, August 13, 2026
Homeताज्या बातम्यास्वातंत्र्यदिनाच्या मुख्य शासकीय सोहळ्याची मंत्रालयात रंगीत तालीम; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते...

स्वातंत्र्यदिनाच्या मुख्य शासकीय सोहळ्याची मंत्रालयात रंगीत तालीम; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १५ ऑगस्टला होणार ध्वजारोहण

स्वातंत्र्यदिनाच्या मुख्य शासकीय सोहळ्याची मंत्रालयात रंगीत तालीम; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १५ ऑगस्टला होणार ध्वजारोहण

मुंबई: स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभासाठी सामान्य प्रशासन विभागाच्या राजशिष्टाचार विभागातर्फे परिपूर्ण तयारी करण्यात आली आहे. शनिवारी, १५ ऑगस्ट रोजी सकाळी ९.०५ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालयात मुख्य ध्वजारोहण होणार असून, त्यानिमित्त आज ध्वजारोहण समारंभाची रंगीत तालीम उत्साहात पार पडली.

आजच्या या रंगीत तालीमीमध्ये राजशिष्टाचार विभागाचे अवर सचिव अविनाश सोलवट यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर उपस्थित पोलीस दलाच्या पथकांनी राष्ट्रध्वजाला सलामी देत मानवंदना दिली. या रंगीत तालीमीमध्ये मुंबई पोलीस, राज्य राखीव पोलीस दल तसेच विशेष घोडेस्वार पथक सहभागी झाले होते. यावेळी पोलीस दल आणि मुख्यमंत्री सुरक्षा दलासह राजशिष्टाचार विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

स्वातंत्र्यदिनाच्या मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, लोकायुक्त, मुंबईतील सर्व मंत्री, खासदार, आमदार, राज्याचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक, मुख्य निवडणूक आयुक्त, मुख्य माहिती आयुक्त आणि महावाणिज्य दूतावासांचे अधिकारी यांच्यासह विविध संवैधानिक संस्था व शासकीय विभागांचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर सेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाचे अध्यक्ष, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा, राज्य मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू तसेच भारतीय भूदल, नौदल, हवाई दल आणि भारतीय तटरक्षक दलाचे वरिष्ठ अधिकारी या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

स्वातंत्र्यदिनाच्या मुख्य शासकीय सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मंत्रालय परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था, संचलन, ध्वजारोहण आणि समारंभाच्या सर्व व्यवस्थांची तयारी पूर्ण करण्यात आली असून, रंगीत तालीमीद्वारे या सर्व व्यवस्थांची पाहणी करण्यात आली. या रंगीत तालीम सोहळ्यात कलाकार किरण शिंदे, अरुण शिंदे आणि विवेक शिंदे यांनी सुरेल सनई वादन केले.

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या