Monday, August 3, 2026
Homeक्राईमपिंपरीतील उच्चशिक्षित कुटुंबाचा दुर्दैवी अंत; उपचारादरम्यान पत्नी व मुलीचाही मृत्यू

पिंपरीतील उच्चशिक्षित कुटुंबाचा दुर्दैवी अंत; उपचारादरम्यान पत्नी व मुलीचाही मृत्यू

पिंपरीतील उच्चशिक्षित कुटुंबाचा दुर्दैवी अंत; उपचारादरम्यान पत्नी व मुलीचाही मृत्यू

आर्थिक विवंचनेतून टोकाचे पाऊल; सुसाईड नोटमध्ये कोणालाही जबाबदार धरू नये, असा उल्लेख

पिंपरी | प्रतिनिधी : पिंपरी-चिंचवडमधील एका उच्चशिक्षित कुटुंबाच्या सामूहिक आत्महत्येच्या प्रयत्नातील पत्नी आणि मुलीचाही उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने ही घटना अधिकच हृदयद्रावक ठरली आहे. यापूर्वी कुटुंबप्रमुख विनोद पिल्ले (वय ५०) यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर सिलजा पिल्ले (४५) आणि पूर्णिमा पिल्ले (१९) यांचाही रविवारी वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरीतील अजमेरा कॉलनी येथील करिष्मा ग्लोरी सोसायटीमध्ये राहणाऱ्या पिल्ले कुटुंबाने शुक्रवारी मध्यरात्री घरात ज्वलनशील विषारी रसायनाचा वापर करून टोकाचे पाऊल उचलले. शनिवारी तिघेही बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. त्यांना तातडीने वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, विनोद पिल्ले यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले, तर पत्नी आणि मुलगी अतिदक्षता विभागात उपचार घेत होत्या. रविवारी उपचारादरम्यान दोघींचाही मृत्यू झाला.

सुसाईड नोटमध्ये आर्थिक अडचणींचा उल्लेख

घटनास्थळी पोलिसांना सुसाईड नोट, विषारी रसायनाची बाटली आणि जळालेला कोळसा आढळून आला. सुसाईड नोटमध्ये आर्थिक विवंचनेमुळे हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचा उल्लेख असून, या घटनेसाठी कोणालाही जबाबदार धरू नये, असे नमूद करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

उच्चशिक्षित कुटुंबावर आर्थिक संकट

पोलिसांच्या माहितीनुसार, विनोद पिल्ले हे उच्चशिक्षित होते आणि त्यांनी संगणक विज्ञान विषयात उच्च शिक्षण घेतले होते. ते पीएचडीधारक होते तसेच नोव्हेंबर २०२४ पर्यंत एका संस्थेत व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. त्यांची मुलगी पूर्णिमा ही चिंचवडमधील महाविद्यालयात संगणक विज्ञानच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत होती, तर पत्नी सिलजा या मोरवाडीतील एका इंग्रजी माध्यम शाळेत समन्वयक म्हणून कार्यरत होत्या.

कुटुंब आर्थिक अडचणीत सापडल्यानंतर सुमारे तीन वर्षांपूर्वी त्यांनी नेहरूनगर येथील स्वतःचा फ्लॅट विकला होता आणि त्यानंतर अजमेरा कॉलनीतील भाड्याच्या घरात राहत होते

या प्रकरणात पोलिसांनी घटनास्थळावरील साहित्य जप्त केले असून तिघांचेही मोबाईल तपासासाठी ताब्यात घेतले आहेत.

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या