Saturday, July 11, 2026
Homeक्राईमरावेरमध्ये दरोड्याचा कट उधळला;दोघांना बेड्या ;तीन फरार

रावेरमध्ये दरोड्याचा कट उधळला;दोघांना बेड्या ;तीन फरार

रावेरमध्ये दरोड्याचा कट उधळला;दोघांना बेड्या ;तीन फरार

तलवार, टॉमी, मिरचीपूड, दोरखंड, बनावट नोटा आणि कार जप्त

रावेर | प्रतिनिधी रावेर शहरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीचा रावेर पोलिसांनी धाडसी पाठलाग करून कट उधळून लावला. या कारवाईत दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून तलवार, टॉमी, मिरचीपूड, दोरखंड, बनावट नोटा आणि इको कारसह मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर त्यांच्या तिघा साथीदारांनी अंधाराचा व शेतशिवाराचा फायदा घेत पसार होण्यात यश मिळविले.

९ जुलै रोजी पाल दुर्गक्षेत्र येथे कर्तव्यावर असलेल्या पोलीस हेड कॉन्स्टेबल ईश्वर चव्हाण यांना पाल गावातून संशयास्पद इको कार रावेरकडे भरधाव जात असल्याची माहिती मिळाली. ही माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी गुन्हे शोध पथकाला तातडीने रवाना करत दोन्ही बाजूंनी नाकाबंदीचे नियोजन केले.

आभोडा गावाजवळ पोलिसांना संशयित वाहन दिसताच चालकाने भरधाव वेगाने पळ काढला. रावेर शहरातील आठवडे बाजार परिसरातून बऱ्हाणपूर रस्त्यावरील शेताकडे जाताना वाहन चिखलात अडकल्याने संशयितांचा पळून जाण्याचा प्रयत्न फसला. यावेळी पोलिसांसह स्थानिक नागरिकांनीही पाठलाग केला. त्यापैकी तिघेजण शेतातून पसार झाले, तर दोघांना नागरिकांनी पकडले. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून दोघांना सुरक्षित ताब्यात घेत उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

वाहनाची तपासणी केली असता त्यामधून लोखंडी तलवार, टॉमी, पेंचिस, लाल मिरचीपूड, दोरखंड, सुमारे तीन लाख रुपये दर्शनी मूल्याच्या चिल्ड्रन बँकेच्या बनावट नोटा तसेच एमएच-१९-ईए-२४०३ क्रमांकाची मारुती सुझुकी इको कार जप्त करण्यात आली. प्राथमिक तपासात संशयित रावेर शहरात गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणात निखिल प्रविण पाटील (वय २०) आणि अल्ताफ जलाल शेख (वय २६, दोघे रा. साईनगर, घोडबंदर रोड, कासार वडवली, जि. ठाणे) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. मेहरबान जहांगीर तडवी (रा. पाल) याच्यासह अन्य दोन साथीदारांचा शोध सुरू आहे.

या प्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांसह शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या टोळीचा इतर गुन्ह्यांशी संबंध आहे का, ते कोणत्या ठिकाणी आणि कोणत्या उद्देशाने गुन्हा करण्याच्या तयारीत होते, याचा सखोल तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन, तुषार पाटील तसेच रावेर गुन्हे शोध पथकाने केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तुषार पाटील करीत आहेत.

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या