Thursday, July 9, 2026
Homeखानदेश'एकाच मिनिटात चार शस्त्रक्रिया कशा?' महासभेत कुत्रे निर्बीजीकरण प्रकरणावर खळबळ

‘एकाच मिनिटात चार शस्त्रक्रिया कशा?’ महासभेत कुत्रे निर्बीजीकरण प्रकरणावर खळबळ

एकाच मिनिटात चार शस्त्रक्रिया कशा?’ महासभेत कुत्रे निर्बीजीकरण प्रकरणावर खळबळ

नगरसेविका प्रतीक्षा सोनवणे यांचा पुराव्यांसह आरोप; आयुक्तांकडून चौकशीचे आश्वासन

जळगाव | प्रतिनिधी

जळगाव महानगरपालिकेच्या बुधवारी झालेल्या महासभेत कुत्रे निर्बीजीकरण मोहिमेतील कथित अनियमिततेचा मुद्दा गाजला. नगरसेविका प्रतीक्षा सोनवणे यांनी पुरावे सादर करत एकाच मिनिटात तीन ते चार कुत्र्यांवर शस्त्रक्रिया झाल्याची नोंद कशी शक्य आहे, असा सवाल उपस्थित केला. या कामात कागदोपत्री आकडे फुगवून लाखो रुपयांची बिले काढण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.

१,५०० शस्त्रक्रिया कागदावरच?’

सोनवणे यांनी सभागृहात सांगितले की, कुत्रे निर्बीजीकरणाचे कंत्राट घेतलेल्या संस्थेने ऑगस्ट २०२५ ते जानेवारी २०२६ या कालावधीत १,५०० शस्त्रक्रिया झाल्याची नोंद केली आहे. मात्र, सादर केलेल्या छायाचित्रांमध्ये एकाच कुत्र्याचे वेगवेगळ्या कोनातून घेतलेले फोटो स्वतंत्र शस्त्रक्रिया म्हणून दाखविल्याचा दावा त्यांनी केला. अनेक छायाचित्रांवरील तारीख, वेळ आणि वार एकसारखे असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले.

संस्थेच्या कामावर प्रश्नचिन्ह

संबंधित संस्थेविरुद्ध यापूर्वी अंबरनाथ येथे गुन्हा दाखल झाल्याचा उल्लेख करत अशा संस्थेला महापालिकेचे काम कसे देण्यात आले, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. या संस्थेला काळ्या यादीत टाकण्याची मागणीही करण्यात आली. यावर महापालिका आयुक्त आदित्य जिवने यांनी प्रकरणाची चौकशी करून दोषी आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले.

इतर विषयांवरही जोरदार चर्चा

महासभेत गणेश कॉलनी परिसरातील भूखंड प्रकरण, शहरातील रस्ते रुंदीकरणाचा प्रस्ताव, उघडी चेंबर्स, महापालिकेच्या इमारतीचे फायर व स्ट्रक्चरल ऑडिट, तसेच न्यायालयीन प्रकरणांसाठी वकिलांच्या पॅनलची नियुक्ती या विषयांवरही सविस्तर चर्चा झाली.

कठोर निर्णयांसाठी लोकप्रतिनिधींची साथ हवी’

नवनियुक्त आयुक्त आदित्य जिवने यांनी आपल्या पहिल्याच महासभेत शहराच्या विकासासाठी नियमांनुसार निर्णय घेतले जातील, असे स्पष्ट केले. जळगावकरांच्या हितासाठी कठोर निर्णय घ्यावे लागल्यास त्यामध्ये राजकीय अडथळे निर्माण होऊ नयेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. तसेच महापालिकेची आर्थिक स्थिती, नागरिकांच्या प्राथमिक गरजा आणि कायदेशीर बाबींचा विचार करून विकासकामांना गती दिली जाईल, असे त्यांनी सांगितले.

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या