Wednesday, June 10, 2026
Homeक्राईमअमळनेरजवळ भीषण तिहेरी अपघातात सहा जण ठार

अमळनेरजवळ भीषण तिहेरी अपघातात सहा जण ठार

 अमळनेरजवळ भीषण तिहेरी अपघातात सहा जण ठार

भरधाव कारची दुचाकी व एसटी बसला धडक; गुजरातहून साखरपुड्यासाठी निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला, एकमेव युवक गंभीर जखमी

अमळनेर | प्रतिनिधी

अमळनेर-धुळे मार्गावर मंगळवारी घडलेल्या भीषण तिहेरी अपघाताने संपूर्ण परिसर हादरून गेला. भरधाव वेगाने येणाऱ्या कारने दुचाकीला धडक दिल्यानंतर एसटी बसलाही जोरदार धडक दिल्याने सहा जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक युवक गंभीर जखमी झाला आहे. साखरपुड्याच्या आनंदासाठी निघालेल्या कुटुंबावर काळाने घाला घातल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातमधील व्यारा येथील महाजन कुटुंबीय आपल्या भाच्याच्या साखरपुड्यासाठी अमळनेर येथे येत होते. राजेंद्र एकनाथ महाजन यांच्या मुलीचा साखरपुडा असल्याने कुटुंबीय चारचाकी वाहनाने धुळ्याकडून अमळनेरच्या दिशेने प्रवास करत होते.

दरम्यान, अमळनेरकडून येणाऱ्या दुचाकीला कारची जोरदार धडक बसली. या धडकेनंतर कारने मागून येणाऱ्या एसटी बसलाही धडक दिली. अपघात इतका भीषण होता की दुचाकीस्वार तथा पशुवैद्यकीय अधिकारी नीलेश सुखदेव तावडे (वय २५, रा. मालपूर, ता. शिंदखेडा) हे हवेत फेकले जाऊन जागीच ठार झाले.

त्यांच्यासोबत असलेली फाल्गुनी ऊर्फ सोनल एकनाथ चव्हाण (रा. भोई, सध्या उधना, सुरत) ही एसटी बसच्या काचेवर जाऊन आदळली. सोनल ही धरणगाव येथे मामाकडे एसवायबीए परीक्षेसाठी आली होती. मैत्रिणीसोबत अजिंठा येथे जाऊन येते, असे सांगून ती घराबाहेर पडली होती. तर नीलेश तावडे हे पहाटे पाच वाजताच घरातून बाहेर पडले होते.

या अपघातात दुचाकीचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. तर कारमधील सुरेश विक्रम महाजन (५२), नंदलाल गोपाल महाजन (६०), निर्मलबाई नंदलाल महाजन (५४) आणि अनिता सुरेश महाजन (४०, सर्व रा. व्यारा, गुजरात, मूळ रा. अंबापिंप्री) यांचा डोक्याला व शरीराला गंभीर मार लागल्याने जागीच मृत्यू झाला.

अपघातानंतर कारचालक आदित्य चंद्रकांत महाजन (२३) हा वाहनात अडकून पडला होता. पोलिस आणि ग्रामस्थांनी लोखंडी टॅमीच्या सहाय्याने कारचा पत्रा उचकावून त्याला बाहेर काढले. त्याचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले असून त्याच्यावर धुळे येथे उपचार सुरू आहेत.

‘११२’ यंत्रणेची तत्परता; पाच मिनिटांत पोलीस घटनास्थळी

अपघाताची माहिती आपत्कालीन सेवा ‘११२’ वर मिळताच अवघ्या पाच मिनिटांत पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, हेडकॉन्स्टेबल कैलास शिंदे, चालक रवींद्र पाटील आणि पोलीस पाटील भागवत पाटील हे घटनास्थळी दाखल झाले.

त्यांनी तातडीने बचावकार्य हाती घेत आदित्य महाजन याला वाहनातून बाहेर काढले. त्यानंतर १०८ रुग्णवाहिकेद्वारे त्याला धुळे येथील रुग्णालयात उपचारासाठी रवाना करण्यात आले.

या भीषण अपघातामुळे अमळनेर-धुळे मार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. साखरपुड्याच्या आनंदासाठी निघालेल्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या