काळजाचा ठोका चुकवणारी दुर्घटना! वर्धा नदीत बुडून पाच जिवलग मित्रांचा दुर्दैवी अंत
घुग्घूस (चंद्रपूर) | प्रतिनिधी
चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घूस येथून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. इंदिरानगर परिसरातील पाच जिवलग मित्रांचा वर्धा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसर शोकसागरात बुडाला आहे. या घटनेमुळे घुग्घूस शहरासह संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इंदिरानगर येथील पाच मित्र सोमवारी दुपारी सुमारे १ वाजेच्या सुमारास म्हातारदेवी परिसरातील वर्धा नदीवर पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना ते नदीच्या खोल पाण्यात गेल्याने एकामागून एक बुडू लागले. एकमेकांना वाचविण्याच्या प्रयत्नात पाचही जण पाण्याच्या विळख्यात अडकले आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच प्रशासन, पोलीस आणि बचाव पथकांनी शोधमोहीम सुरू केली. मंगळवारी सकाळपासून बोटींच्या साहाय्याने नदीपात्रात कसून शोधकार्य राबविण्यात आले. अनेक तासांच्या अथक प्रयत्नांनंतर दुपारपर्यंत पाचही युवकांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.
या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या युवकांची नावे तन्मय नवनाथ पथाडे (१७), सम्यक देवराव सोनटक्के (१८), सन्नी अशोक आस्मपेल्ली (१९), रोहित बाबाराव बोबडे (१९) आणि शिव ऊर्फ नकुल भास्कर केळझरकर (१९) अशी आहेत.
एकाच परिसरातील पाच जिवलग मित्रांचा अशा दुर्दैवी घटनेत मृत्यू झाल्याने इंदिरानगर परिसरात शोककळा पसरली आहे. मृत युवकांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरातील नागरिकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले आहेत. अंत्यदर्शनासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण चंद्रपूर जिल्हा हादरला असून, वर्धा नदीकाठावरील सुरक्षेच्या उपाययोजनांबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पाच उमलत्या जीवांचा अकाली अंत झाल्याने सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे.
