मान्सूनची वाटचाल मंदावली; पेरणीची घाई टाळा : कृषी विभागाचे आवाहन
मुंबई | प्रतिनिधी
राज्यात मान्सूनने दक्षिण कोकणात प्रवेश केला असला तरी त्याची प्रगती अद्याप संथ गतीने सुरू आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील काही भागांमध्ये ९ जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. मात्र त्यानंतर किमान १५ जूनपर्यंत मान्सूनच्या प्रगतीचा वेग आणि पावसाचा जोर मंदावण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, विदर्भ, मराठवाडा, खान्देश आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये १५ जूनपर्यंत दुपारनंतर ढगाळ वातावरण, मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. मात्र हा पाऊस सर्वत्र आणि सातत्याने होण्याची शक्यता नसल्याने खरीप हंगामातील पेरणीसाठी आवश्यक असलेली अनुकूल परिस्थिती अद्याप निर्माण झालेली नाही.
राज्यातील अनेक भागांमध्ये उष्णतेची तीव्रताही कायम राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. किमान १२ जूनपर्यंत विदर्भ आणि खान्देशातील काही भागांमध्ये कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक राहू शकते. तर मराठवाड्यात तापमान ३५ ते ४० अंश सेल्सिअसदरम्यान राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे उष्णतेचा तडाखा कायम राहणार असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
कृषी व आपत्ती व्यवस्थापन विभागाने शेतकऱ्यांना विशेष सतर्कतेचा इशारा दिला आहे. आगामी काही दिवसांत होणाऱ्या वादळी पावसावर विश्वास ठेवून पेरणीची घाई करू नये. पुरेसा आणि सातत्यपूर्ण पाऊस झाल्यानंतरच पेरणीचा निर्णय घ्यावा, असे विभागाने स्पष्ट केले आहे.
तसेच विजांच्या कडकडाटाच्या वेळी झाडाखाली, टिनशेडखाली, विद्युत ट्रान्सफॉर्मर, वीज खांब किंवा उच्चदाब वाहिन्यांच्या परिसरात थांबणे टाळावे. वादळी वाऱ्यांपासून आणि विजेच्या धोक्यापासून स्वतःची व कुटुंबाची सुरक्षा करण्याचे आवाहनही प्रशासनाने केले आहे.
दरम्यान, मान्सूनच्या पुढील प्रगतीकडे शेतकऱ्यांसह कृषी विभागाचे लक्ष लागले असून, आगामी आठवड्यातील हवामान परिस्थितीनुसार खरीप हंगामाचे नियोजन ठरणार आहे.